Sangli Samachar

The Janshakti News

आरोग्य विमा दाव्याबाबत एका तासात निर्णयाचा आदेश !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ३० मे २०२४
विमा कंपनीला आरोग्य विम्याच्या दाव्याबाबतचा अधिकृत निर्णय पॉलिसीधारकाने विनंती केल्यानंतर एका तासाच्या आत घ्यावा लागेल, असा आदेश विमा नियामक प्राधिकरणाने (इर्डा) दिला आहे. 'इर्डा'ने आज एक परिपत्रक जारी करून हा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. 

रोखविरहित उपचारांसाठी (कॅशलेस पॉलिसी) पॉलिसीधारकांनी दावा केल्यानंतर त्याबाबतचा अधिकृत निर्णय एका तासाच्या आत घेणे आणि रुग्णालयाने रुग्णाला घरी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर तीन तासांच्या दावा प्रक्रीया पूर्ण करणे अनिवार्य आहे. 

यानंतर उशीर झाल्यामुले रुग्णालयाकडून आकारण्‍यात येणारे शुल्क विमा कंपनीला भरावे लागेल, असेही 'इर्डा'ने स्पष्ट केले आहे. आरोग्य विम्याबाबतची पूर्वी जारी करण्यात आलेली ५५ परिपत्रके या मास्टर परिपत्रकामुळे रद्द झाली असून, पॉलिसीधारकांचे सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक आरोग्य विम्याला चालना देण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे 'इर्डा'ने एका निवेदनात म्हटले आहे. 


आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्या पॉलिसीधारकाला अगदी सुलभ पद्धतीने पैसे मिळावेत, यासाठीच्या उपायांवरही भर दिला आहे. आरोग्य विमा क्षेत्रात विश्वासाचे आणि पारदर्शकतेचे वातावरण निर्माण करणे आणि पॉलिसीधारकांना सशक्त बनवण्याच्या दिशेने केलेला हा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे, असेही 'इर्डा'ने नमूद केले आहे. क्लेम सेटलमेंटसाठी, पॉलिसीधारकाला कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही, तर विमा कंपन्यांनी आणि टीपीएने हॉस्पिटलमधून आवश्यक कागदपत्रे गोळा केली पाहिजेत, असेही 'इर्डा'ने म्हटले आहे.