Sangli Samachar

The Janshakti News

एस. टी. प्रवाशांना घरबसल्या तिकीट काढण्याची सोय !



| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २४ मे २०२४
जानेवारी २०२४ पासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी ऑनलाइन आरक्षण प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांना घरबसल्या एसटीचे आरक्षित तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाने npublic.msrtcors.com अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ऑनलाइन तिकीट आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून पाच महिन्यांत राज्यातील १३ लाखांहून अधिक तिकिटाची विक्री या ऑनलाइन आरक्षण प्रणालीतून झाली आहे. मागील वर्षी या पाच महिन्यांत पावणेदहा लाख तिकिटांची विक्री झाली होती.

राज्यभरातील १० हजार प्रवासी दररोज या ऑनलाइन सुविधेचा लाभ घेत आहेत. दरम्यान, मोबाईलवर MSRTC Bus Reservation ॲपच्या माध्यमातून देखील प्रवाशांना घरबसल्या तिकीट काढता येते. या दोन्ही पद्धतीने तिकीट काढण्याच्या प्रणालीत बदल करून ते अद्ययावत करण्यात आले आहे. कोणत्याही प्रवाशाला मोबाईलद्वारे घरबसल्या सहजपणे ऑनलाइन आरक्षण प्रणालीद्वारे तिकीट काढता येईल, अशी सोय त्यात करण्यात आली आहे. ऑनलाइन प्रणालीद्वारे अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्तींना देखील सवलतीतून आगाऊ आरक्षणाचे तिकीट मिळू शकते. त्यासाठी महामंडळाने npublic.msrtcors.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे.


अडचण आल्यास 'या' क्रमांकावर करा संपर्क

एसटी बसचे ऑनलाइन आरक्षण करताना प्रवाशांना तांत्रिक अडचण आल्यास ७७३८०८७१०३ या क्रमांकावर संपर्क साधावा लागेल. हा क्रमांक प्रवाशांच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी २४ तास उपलब्ध असणार आहे. तसेच ऑनलाइन आरक्षण करताना पैसे भरून देखील तिकीट न मिळाल्यास (पेमेंट गेट वे संदर्भात) या तक्रारींसाठी ०१२०-४४५६४५६ हा क्रमांक महामंडळाने प्रवाशांसाठी दिला आहे.