Sangli Samachar

The Janshakti News

राज्यात कोणाचे पारडे जड; गुप्तचर यंत्रणेचे सर्वेक्षण काय सांगते ?| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २३ मे २०२४
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर देशाचेच नव्हे, तर जगभरातील नागरिकांचे लक्ष आहे. याविषयी विविध मतमतांतरे सुरू आहेत. भारताच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना बघायला मिळेल, असा अनेकांना विश्वास वाटत असला, तरी मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने जातो हे निकालाच्या दिवशी प्रत्येकाला कळेलच, मात्र देशाबाहेरही चर्चा सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीबाबत सूत्रांकडून महत्त्वाची माहिती मिळत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य आणि केंद्रातील गुप्तचर यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात महायुतीचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे. पाचव्या टप्प्यात मुंबईसह महाराष्ट्र राज्यातील मतदान पार पडले आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाचा टक्का घसरला असला, तरी अनेक मतदान केंद्रात अपेक्षेपेक्षा अधिक मतदान झाल्याचे एकंदरीत मिळालेल्या आकडेवारीवरून समोर येत आहे.

गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहिती

मुंबईसह राज्यात पार पडलेल्या मतदानानंतर राज्यात कोणाचे पारडे जड आहे, कोण निवडून येणार कुठल्या राजकीय पक्षाला किती जागा मिळतील याच्यावर चर्चा सुरू असून अनेक जण मतदानाच्या आकडेवारीवरून अंदाज बांधताना दिसत आहेत. सरकारी गुप्तचर यंत्रणादेखील संपूर्ण मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मतदारांचा कल कुठल्या राजकीय पक्षाकडे आहे, कुठल्या उमेदवाराचे पारडे जड आहे याची माहिती गुप्तचर यंत्रणा जाणून घेत असते. दोन वेगवेगळ्या गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, यंदा राज्यात मतदारांमध्ये मोठा संभ्रम आहे, पक्षफुटीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जाते.

कोणाला मिळणार किती जागा ?

महाराष्ट्रात महायुतीला ४८ पैकी २८ जागांवर विजय मिळवू शकतो. उर्वरित जागांवर महाआघाडीचे खासदार निवडून येण्याची शक्यता राज्यातील एका सरकारी संस्थेच्या सूत्रांनी वर्तवली आहे, तर केंद्रातील एका संस्थेने ३०/१८ चे गणित मांडले असले, तरी ४ जून रोजी चित्र स्पष्ट होईल.