Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीत "ये दोस्ती हम नही तोडेंगे" नंतर चर्चा रंगतेय, "हम साथ साथ है |" ची ! |"



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २३ मे २०२४
लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्राचे पडघम बंद झाले. पण त्याचा आवाज मात्र अजूनही घुमत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जे मतदार संघ विविध कारणांनी गाजले, त्यामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ सर्वात आघाडीवर होता.

मिळणार मिळणार म्हणून झुलवत ठेवलेल्या विशाल पाटील यांना अखेरच्या क्षणी कात्रज चा घाट दाखवला. पण या साऱ्याचा अंदाज आल्याने विशाल पाटील यांनी बंडखोरी करत, महाआघाडीसह महायुतीच्या उमेदवारांशी चांगलीच झुंज दिली, नव्हे तर विद्यमान खासदार संजय काका पाटील व महाआघाडीचे पै. चंद्रहार पाटील या दोघांनाही धोबीपछाड दिल्याची चर्चा संपूर्ण राज्यात रंगली होती.

या पार्श्वभूमीवर सर्वात आघाडीवर राहिले ते काँग्रेसचे युवा नेते डॉ. विश्वजीत कदम हे. विशाल पाटील यांच्यासाठी त्यांनी चांगलीच झुंज दिली. यादरम्यान "ये दोस्ती हम नही तोडेंगे !" हा डायलॉग चांगलाच गाजला. निवडणूक पार पडली... आणि आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी "हम साथ साथ है |" चा नारा बुलंद होताना दिसतो आहे. त्याचे घडले असे...

सांगलीत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रेमी कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवार राहिलेले विशाल पाटील यांच्यासाठी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी झटून काम केल्याने आणि विशाल पाटील यांच्या विजयाच्या आशा असल्याने या स्नेहमेळावाचे आयोजन केल्याचे बोलले जात आहे. तसेच या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून आगामी काळात पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकात एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या स्नेहमेळाव्यात काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम, लोकसभेचे उमेदवार विशाल पाटील, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सांगली शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटी कडून या स्नेहमेळाव्याचे बायपास रोडवरील एका लॉनमध्ये आयोजन करण्यात आले होते. या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सांगलीमध्ये दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्नेहभोजनासाठी काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आणि याच स्नेहभोजनासाठी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी देखील उपस्थित लावली. विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या स्नेहभोजनासाठी उपस्थिती लावल्याने आता सांगलीत चर्चांना उधाण आले आहे.