Sangli Samachar

The Janshakti News

संजय राऊत हा महाराष्ट्रातला बिलावल भुट्टो - नितेश राणे| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ७ मे २०२४
संजय राऊत हा महाराष्ट्रातला बिलावल भुट्टो आहे, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. मुंबईतील २६/११ च्या दहशदवादी हल्ल्यात शहीद हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतून लागली नसून ती एका रा.स्व.संघ समर्थक पोलीस अधिकाऱ्याने चालवली होती, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. यावर उबाठा गटाच्या संजय राऊतांनीही टीका केली होती. त्यांना आता राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

नितेश राणे म्हणाले की, "अपेक्षेप्रमाणे संजय राऊतांनी टीका केली. वर्षभरापूर्वी भारत, मोदीजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल जी भाषा बिलावल भुट्टोने वापरली तीच भाषा महाराष्ट्रातले बिलावल भुट्टो म्हणजेच संजय राऊतांनी वापरली आहे. खरंतर अशा देशद्रोहींवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. निवडणूकीच्या माध्यमातून पाकिस्तानला मदत करण्याचं काम ते करत आहेत. त्यामुळे या सर्व पाकिस्तानच्या एजंटवर देशद्रोहाचा खटला चालवायला हवा," असे ते म्हणाले.


"भाजपच्या जाहीरातीत काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या कुठल्याही घटक पक्षाच्या नावाचा उल्लेख नव्हता. तरीही 'चोर की दाढी में तिनका' म्हणतात त्याप्रमाणे मुस्लिम लीगची बी टीम आणि पाकिस्तानचे एजंट असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना हिरव्या मिरच्या झोंबल्या. विजय वडेट्टीवारांनी आपला असली रंग दाखवला. कसाब आणि शहीद हेमंत करकरे यांच्यातील घटनाक्रम उघड करुन त्यांनी शहीदांचा अपमान केला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानवर असलेलं त्यांचं प्रेमही उघड झालं आहे," असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, "काँग्रेस पक्षाला मत देणं म्हणजे भारतात तिरंगा खाली उतरवून पाकिस्तानचा झेंडा फडकवणं आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आली असताना त्यांच्या विजय मिरवणूकीमध्ये पाकीस्तानचे झेंडे फडकताना दिसले. ते स्वत:ला भारतीय म्हणवून इथे पाकिस्तानचं काम करत आहेत. पाकिस्तानमध्ये बसलेल्या आपल्या बापाला खुश करण्यासाठी ते देशभक्त असलेला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर टीकाटीपण्णी करत आहेत," असा घणाघात त्यांनी केला.