Sangli Samachar

The Janshakti News

राज्यात 11 मतदारसंघांमध्ये मतदान सुरू !| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ७ मे २०२४
राज्यातील तिसर्‍या टप्प्यातील निवडणुकांसाठीच्या प्रचाराचा धुरळा रविवारी खाली बसला. मंगळवारी मतदान होत असलेल्या सर्व अकराही मतदारसंघांत महायुतीसह महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅली, रोड शो आणि जाहीर सभा झाल्या. जवळपास आठवडाभर सुरू असलेल्या प्रचारतोफा रविवारी संध्याकाळी थंडावल्या.

कोल्हापूरसह अकरा मतदारसंघांत मतदान होणार आहे. या सर्व मतदारसंघांत हाय व्होल्टेज लढती होत आहेत. कोल्हापूर, हातकणंगले, रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे.

कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक अशी थेट लढत होत आहे. हातकणंगलेत महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खा. धैर्यशील माने यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि मविआचे सत्यजित पाटील-सरुडकर, सांगलीत महायुतीचे खा. संजय पाटील विरुद्ध मविआचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील अशी तिरंगी लढत होत आहे.


देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती मतदारसंघात मविआच्या खा. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजयीत थेट लढत होत आहे. सातार्‍यात खा. उदयनराजे भोसले (महायुती) विरुद्ध शशिकांत शिंदे (मविआ), रायगडमध्ये खा. सुनील तटकरे (महायुती) विरुद्ध अनंत गीते (मविआ), धाराशिवला ओमराजे निंबाळकर (मविआ) विरुद्ध अर्चना पाटील (महायुती), लातूरला डॉ. शिवाजी काळगे (मविआ) विरुद्ध सुधाकर शृंगारे (महायुती), सोलापूरला प्रणिती शिंदे (मविआ) विरुद्ध राम सातपुते (महायुती), माढामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर (महायुती) विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील (मविआ) आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मविआचे उमेदवार आणि विद्यमान खा. विनायक राऊत विरुद्ध केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांच्यात थेट लढत होत आहे.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

राज्यातील या अकरा मतदारसंघांत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बारामतीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार; तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्गात विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे, रायगडला सुनील तटकरे, सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे आणि सातार्‍यात विद्यमान खा. उदयनराजे भोसले यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंत राज्यात सहा प्रचारसभा झाल्या आहेत.

75 टक्के मतदानाचे निवडणूक आयोगाचे उद्दिष्ट

वाढत्या तापमानाचा फटका मतदान प्रक्रियेवर बसू नये, यासाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. तिसर्‍या टप्प्यात राज्यात किमान 75 टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवले आहे. मतदानाच्या ठिकाणी मंडप आणि पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिवाय प्रत्येक बूथवर पाण्याबरोबरच 'ओआरएस'ची पाकिटे दिली जाणार आहेत.