Sangli Samachar

The Janshakti News

महाविकास आघाडीमध्ये बिघाडी ? नाना पटोलेंनी ठाकरे गटाला स्पष्टचं सांगितलं !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २४ मे २०२४
लोकसभा निवडणूकीच्यावेळी महाविकास आघाडीमध्ये सांगलीचे राजकारण रंगले होते. सांगलीमध्ये ठाकरे गटाने उमेदवार दिल्यानंतर सांगलीतील काही कॉंग्रेस नेते नाराज होते. यामध्ये विशाल पाटील यांनी बंड देखील पुकारले होते. या प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा सांगलीचे नाव चर्चेमध्ये आले आहे. निवडणूकीनंतर रंगलेल्या राजकारणानंतर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील ठाकरे गटाला स्पष्ट सांगितले.

ठाकरे गट नाराज

सांगलीमध्ये कॉंग्रेसतर्फे स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सांगलीचे कॉंग्रेस नेते व पदाधिकारी उपस्थित होते. याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या उमेदवारीवरुन बंड पुकारलेले विशाल पाटील देखील उपस्थित होते. कॉंग्रेसच्या स्नेहभोजनाला विश्वजीत पाटील व विशाल पाटील हे उपस्थित राहिल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. यावरुन मात्र ठाकरे गट नाराज झाला आणि त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकारावर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुखांनी आक्रमक भूमिका घेत विधानसभेच्या सर्व जागा पाडू असा इशारा कॉंग्रेसला दिला.

त्यावर ठाकरे गटाने बोलले पाहिजे

ठाकरे गटाच्या या टीकेवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सडेतोड उत्तर दिले. सर्व जागा पाडू या ठाकरे गटाच्या टीकेवर नाना पटोले म्हणाले, "हे सर्व जनतेच्या हातात असते नेत्यांची नाही. त्यामुळे जनता ठरवेल. सांगलीत पाणीटंचाई आहे, त्यावर ठाकरे गटाने बोलले पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात एकमेकांशी संबंध असतात. विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांची भाऊबंधकी आहे. त्यामुळे ते स्नेहभोजनाला आले असतील. सांगलीत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पंजा नव्हताच" अशा शब्दांत नाना पटोले यांनी ठाकरे गटावर टिप्पणी केली. कॉंग्रेस व ठाकरे गटामध्ये सांगलीच्या राजकारणावरुन कलगीतुरा रंगला आहे. यावरुन महाविकास आघाडीमध्ये सारं काही अलबेल चालू नसल्याचे बोलले जात आहे.