Sangli Samachar

The Janshakti News

तुम्ही कारमध्ये प्लास्टिकच्या बाटलीत पाणी ठेवता का? पण हे खरंच सुरक्षित आहे का?| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ मे २०२४
पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीचा वापर करू नये, असं तज्ज्ञ सांगतात. धातू किंवा काचेची बाटली वापरावी, असा सल्ला दिला जातो. प्रवासात कारमध्ये प्लास्टिकची बाटली वापरणं सोयीचं असलं तरीही उन्हाळ्याच्या दिवसात प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी प्यावं का ?

देशभरात सगळीकडे उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर पडताना सोबत पाण्याची बाटली घेतल्याशिवाय बाहेर पडणं शक्य नाही. त्यामुळं प्रवासाला निघाल्यानंतर किंवा अगदी घरातून बाहेर पडतानासुद्धा आपण कारमध्ये आपल्या जवळ पाण्याची बाटली ठेवतोच. काचेची बाटली वापरणं आरोग्यासाठी योग्य असलं, तरी तिचा सहज वापर करता येत नाही. घरात किंवा ऑफिसमध्ये काचेची बाटली वापरणं शक्य आहे. त्यामुळे बाहेर पडल्यानंतर सर्रास प्लास्टिकच्या बाटल्या वापरल्या जातात. बाहेरच्या प्रवासात दुकानांमध्येसुद्धा आपल्याला प्लास्टिकच्या बाटलीतूनच पाणी मिळतं; पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्लास्टिकच्या बाटलीत पाणी ठेवणं सुरक्षित आहे का?

मायक्रोप्लास्टिक पाण्यात विरघळतं?
आरोग्यासाठी प्लास्टिक हानिकारक असतं आणि उन्हाळ्याच्या दिवसात तापमान जास्त असल्यानं मायक्रोप्लास्टिक पाण्यात विरघळू शकतं. याचा आपल्या आरोग्यावर दीर्घ काळ परिणाम होऊ शकतो. याखेरीज जेव्हा तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कारच्या आतमध्ये प्लास्टिकच्या बाटलीत पाणी ठेवता तेव्हा ते लवकर गरम होत असतं. उन्हाळ्यात जेव्हा गरम पाणी पिणंसुद्धा आपल्याला शक्य नसतं, तेव्हा प्लास्टिकच्या बाटलीमध्ये ठेवलेलं पाणी आपल्या आरोग्यासाठी योग्य नसतं.

याला पर्याय काय?
स्टेनलेस स्टील किंवा तांब्याच्या बाटलीमध्ये पाणी ठेवून ते वापरता येऊ शकतं. कोणत्याही धातूची बाटली तुम्ही पाण्यासाठी वापरू शकता. तसंच ज्यामध्ये पाणी दीर्घ काळ गार राहील, अशी बाटली केव्हाही चांगली. प्रवासामध्ये जास्त काळ तुम्हाला गार, शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळेल, अशी बाटली वापरावी. याशिवाय कुठेही बाहेर पाणी विकत घेण्याची वेळ आली तर विकत घेतलेल्या प्लास्टिकच्या बाटलीमधलं पाणी आपल्याजवळ असलेल्या धातूच्या बाटलीमध्ये ओतून घ्यावं आणि पिण्यासाठी तेच वापरावं.

प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं हे केवळ आरोग्यासाठीच हानिकारक आहे, असं नाही, तर पर्यावरणासाठीसुद्धा ही बाब हानिकारक आहे. प्लास्टिकच्या बाटल्या नॉन-बायोडिग्रेडेबल असतात अर्थात त्यांचं विघटन होऊ शकत नाही. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो.