Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान !



सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १५ मे २०२४
सांगलीच्या जागेबाबत घाई करण्यात आली. आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं. आम्ही सांगलीचे वाघ आहोत हे एका रात्रीत हे विधान आलं नाही. सांगली जिल्ह्यात आम्ही वर्षानुवर्षे काम करत आहोत. जनतेच्या सुखदुखात सहभागी होतोय. सांगली जिल्ह्यातील भावना मांडणं माझं काम होते. नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे सांगलीच्या जागेसाठी लढले. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी एका विशिष्ट उद्देशाने एकत्र आलेत. या परिस्थितीत काँग्रेसनं मनाचा मोठेपणा दाखवला असं सांगत काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीच्या राजकारणावर भाष्य केले.

आमदार विश्वजित कदम म्हणाले की, गेल्या २ वर्षापासून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु झाली, त्यात ती यात्रा महाराष्ट्रात आली, तेव्हा ३२५ किमी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रात २ नेते चालले. मी नांदेड ते बुलढाणा पायी चाललो. त्यामुळे मी भाजपासोबत जाण्याचा प्रश्न येतोच कुठे? कर्नाटकातील निवडणूक असेल तिथे काँग्रेसचे सिद्धरमैय्या विजयी झाले. ते सांगलीत आले तेव्हा त्यांच्या सत्काराचा पहिला कार्यक्रम सांगली शहरात आयोजित केला होता. एक काळ मी महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाहिला आहे. महाराष्ट्रात वैचारिक राजकारण होत होते, परंतु व्यक्तिगत लढाई नव्हती. परंतु आज विरोधी पक्षातील आमदाराशी जाहीरपणे बोललं तरी हा भाजपात चाललाय, हा शिवसेनेत चाललाय, हा राष्ट्रवादीत चाललाय अशी चर्चा होते. याचा अर्थ राजकारणात व्यक्तिगत संबंध असूच नये का? असं सांगत त्यांनी भाजपा प्रवेशावर स्पष्टीकरण दिले.


तसेच मविआतील तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसले होते. शाहू महाराजांना कुठल्या पक्षात लढायचं हे त्यांनी ठरवलं. त्याठिकाणी शाहू महाराजांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढण्याचं ठरवलं. त्यामुळे कोल्हापूरचा आणि सांगलीचा संबंध नव्हता. हातकणंगले जर ठाकरेंना मिळाली तर सांगली कशासाठी? हे आमचे म्हणणं होते. ३ मे रोजी कोल्हापूरात उद्धव ठाकरे आले तेव्हा निवडणुकीची वस्तूस्थिती, सांगलीची परिस्थिती यावर व्यक्तिगत चर्चा केली.२ महिन्याचा कालावधी हा उत्सुकतेचा, संघर्षाचा आणि काही प्रमाणात निराशेचा होता. एखाद्या नेतृत्वाला जी गोष्ट हवी असते, ती मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यानंतर अचानक एखादा निर्णय होतो, त्यानंतर काय भावना असते या सर्व गोष्टीतून मी २ महिन्यात गेलो आहे असंही विश्वजित कदमांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसचं संघटन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात कार्यकर्ते सापडतील. उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, शरद पवारांच्या बाबतीत या वयात जे घडलं त्याबाबत महाराष्ट्रातील जनतेच्या मनात तीव्र संताप आहे. महाराष्ट्राची जनता विचार करून मतदान करते असं विश्वजित कदमांनी म्हटलं. एबीपी माझाच्या

मी विशालला शब्द दिला होता...

विशाल पाटील आणि माझी जोडी तुटलीय हे कुणी सांगितले? सांगलीच्या जागेबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीपर्यंत इच्छा होती, मी लोकसभेची निवडणूक लढवावी. परंतु माझ्या मतदारसंघातील लोकांना मला सोडायचं नव्हते अशी माझी भावना होती. उद्धव ठाकरेंबाबत व्यक्तिश: प्रचंड आदर आहे. बाळासाहेबांचा वारसा ते चालवतायेत, संघर्षातून त्यांना वाटचाल करावी लागतेय. परंतु सांगलीच्या बाबतीत निर्णय घेण्यास घाई झाली. मी विशालला शब्द दिला होता. खासदारकीमध्ये आम्ही कुणी आडवं येणार नाही, जरी पक्षश्रेष्ठींनी सांगितले तरी मी माझ्या पातळीवर ते अडवण्याचा प्रयत्न करेन असा खुलासाही विश्वजित कदम यांनी केला.