Sangli Samachar

The Janshakti News

'बाल न्याय मंडळाचा निकाल धक्कादायक', पुणे हिट अँड रन प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे पोलिसांची पाठराखण !| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २२ मे २०२४
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची गंभीर दखल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. देवेंद्र फडणवीस आज पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले. त्यांनी संपूर्ण घटनेचा आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईचा आढावा घेतला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांची पाठराखण केली. पुणे पोलिसांनी योग्य कारवाई केली. पोलिसांनी सर्व घटनेचे पुरावे बाल न्याय मंडळाला दिले. पण तरीही बाल न्याय मंडळाने दिलेला निकाल हा पोलिसांसाठी धक्कादायक होता, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. 

“मुळातच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत जो काही अर्ज रिमांडचा सबमिट केला होता, त्यात अतिशय स्पष्टपणे कलम 304 नमूद आहे. स्पष्टपणे लिहिलं आहे की, हा जो मुलगा आहे तो 17 वर्षे 8 महिन्यांचा असल्यामुळे निर्भया कांडानंतर जे काही अमेंडमेंट झालं, आणि 16 वर्षाच्या वरचे जे मुलं असतील त्यांना हेनियस क्राईममध्ये अडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं. माझ्याकडे रिमांड ॲप्लिकेशनही माझ्याकडे आहे. अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.


“कलम ३०४ ए नाही तर हा कलम ३०४ च आहे. अशा प्रकारे पोलिसांनी केलं होतं. दुर्देवाने बाल न्याय मंडळाने वेगळी भूमिका घेतली आणि अडल्ट ट्रीट करण्याचा अर्ज सीन आणि फाईल्ड बाजूला ठेवला आणि रिमांडच्या अर्जावर त्यांनी मला असं वाटतं की अतिशय लिनियल्ट अशाप्रकारचा व्ह्यू घेत 15 दिवस सोशल सर्व्हिस करा, डिअॅडिक्शन करा, अशाप्रकारच्या गोष्टी त्यामध्ये लिहिल्या. खरं म्हणजे हा पोलिसांकरता एक धक्का होता. कारण पोलिसांनी सर्व पुरावे दिले आहेत. कुठल्या हॉटेलमध्ये तो आहे, काय केलं आहे, गाडीचे पुरावे दिले आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘न्यायासाठी जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची इच्छा’

“अशा प्रकरणात पोलिसांनी पुरावे दिले आहेत. कोणत्या हॉटेलात आहे, काय केलं, वयाचे पुरावे दिले, गाडीचे पुरावे दिले, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि दुरुस्ती दिल्यानंतर ज्युवेनाईल बोर्डाने आश्चर्यकारक भूमिका घेतली. त्यामुळे वरच्या कोर्टात अर्ज केला. कोर्टाने या संदर्भात सांगितलं की या बाबत ज्युवेनाईल कोर्टात जावं लागेल. या कायद्यात त्यांची ऑर्डर रिव्ह्यू करण्याचा अधिकार ज्युवेनाईल बोर्डाला आहे. त्यांनी नाही केलं तर आमच्याकडे या. आम्ही अर्ज केला. आज किंवा उद्या या ऑर्डरवर सुनावणी होईल. वरच्या कोर्टाचा दृष्टीकोण पाहता ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड ऑर्डर देतील. नाही दिली तर आम्ही वरच्या कोर्टात जाऊ. या प्रकरणात जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची इच्छा आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“ज्यांनी अंडरएजला दारू दिली त्यांच्यावर पहिल्यांदा अटक केली. चार लोकांना अटक केली. पोलिसांनी त्यांना चार दिवसांची रिमाइंड दिलं. त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढची कारवाई करत आहे. पोलिसांनी प्रकरण गंभीरपणे घेतलं आहे”, असं फडणवीसांनी सांगितलं.