| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ९ मे २०२४
मोदींसोबत जाण्यासाठी ज्यांनी पक्ष सोडला, त्यांना पुन्हा प्रवेश नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. त्यांच्या या भूमिकेबद्दल बोलताना अजित पवारांनी एक विधान केले आहे, ज्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांनी उदाहरण देत पवारांच्या विधानावर उत्तर दिलं. त्याचबरोबर शरद पवार त्यांच्या मनाप्रमाणेच निर्णय घेतात आणि सर्वांनी मिळून घेतल्याचे दाखवतात, असेही अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांची पुण्यात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांनी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. शरद पवारांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे विधान केले त्यावरही ते बोलले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील वाटचालीचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ, असं शरद पवार एका मुलाखतीत म्हणालेले. त्यावरही अजित पवारांनी भाष्य केले.
तीन मुद्दे... अजित पवार काय म्हणाले?
"पवार साहेबांना ज्यावेळी निर्णय घ्यायचा असतो, तेच बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात आणि असं दाखवतात की, तो सामूहिक निर्णय आहे. आम्ही जो निर्णय घेतला, तेव्हा ते एकटे त्या गोष्टीला विरोध करत होते. किंवा मध्येच म्हणायचे की, तुम्ही जा. मी आता बाजूला होतो. मी निवृत्त होतो, असं ते करायचे. ते त्यांना पाहिजे तेच करतात. फक्त दाखवताना हा सामूहिक निर्णय आहे, असं दाखवतात. परंतू त्यांच्या मनामध्ये जे असतं, तेच ते ठामपणे करतात", असे उत्तर अजित पवार यांनी दिले.