Sangli Samachar

The Janshakti News

महाराष्ट्राच्या राजकीय विद्यापीठाने गल्ली ते दिल्लीपर्यंत रणरणत्या उन्हापेक्षा जास्त घाम फोडला ,!| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ४ मे २०२४
लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या दोन टप्प्यांमध्ये अपेक्षित मतदान न झाल्याने सत्ताधारी भाजप आणि सत्ता बदलासाठी कंबर कसलेल्या इंडिया आघाडीमध्ये सुद्धा चिंता पसरली आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यांमध्ये कोणत्याही परिस्थितीत मतदार राजाला मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यासाठी अत्यंत चुरशीने निवडणूक रणधुमाळी सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये सभांचा महापूर आला आहे. ज्या पश्चिम महाराष्ट्राने महापूर सातत्याने अनुभवला त्याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून सभांचा महापूर सुरू आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंत नेत्यांची वर्दळ साखर पट्ट्यात होत असली, तरी कोणताच उमेदवार विजयाची श्वाश्वती देऊ शकत नाही इतकी नाजूक स्थिती आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत एकही संधी गमावली जाणार नाही, याची काळजी घेतली आहे. 5 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील प्रचार थांबणार आहे.

साखर पट्ट्यात प्रतिष्ठा पणाला

पहिल्या दोन टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील विदर्भामध्ये आणि मराठवाड्यातील जागांवर मतदान असल्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचाराचे रणधुमाळी तितकी सुरु नव्हती. मात्र, तिसऱ्या टप्प्यामध्ये संपूर्णतः साखर पट्टा असलेल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर नव्हे, तर सहकार क्षेत्रावरही ताबा मिळवून असलेल्या भागात निवडणुकीचा केंद्रबिंदू झाला आहे. कोल्हापूर विभागात 37 साखर कारखाने असून सांगलीमध्ये 16 साखर कारखाने आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 24 सहकारी साखर कारखाने असून खासगी 13 कारखाने आहेत. सांगलीमध्ये सहकारी 10 कारखाने असून खासगी 6 कारखाने आहेत.

या सर्व कारखान्याचे राजकारण आणि सहकार जाळं सर्वसामान्य शेतकऱ्याच्या चुलीपर्यंत असल्याने या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये अस्तित्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु आहे. या पट्ट्याने नेहमीच काँग्रेस राष्ट्रवादीला साथ दिली असली तरी साखर पट्ट्यांमध्ये महायुतीचा झालेला शिरकाव आणि नेत्यांनी बदललेल्या राजकीय भूमिकांमुळे चित्र पूर्णत: बदलून गेलं आहे. साखर कारखानदारांची मक्तेदारी हा मतदानाचा केंद्रबिंदू आहे.

मोदी, अमित शाह आणि योगींच्या सभा

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजकारण कमालीचे तापले गेलं आहे. महाविकास आघाडीकडून आपल्या पाच दशकातील राजकीय अनुभव पणाला लावत शरद पवार यांनी साखरपट्टा पिंजून काढला आहे. उद्धव ठाकरे यांनीही चांगलाच जोर लावला आहे. महाविकास आघाडीची युवा फळी सुद्धा चांगलीच सक्रिय झाली आहे. यानंतर महायुतीकडून सुद्धा थेट पीएण मोदी, अमित शाह आणि सीएम योगींना साखर पट्ट्यात प्रचारासाठी उतरवण्यात आले. कोल्हापूर, माढा, सोलापूर, सातारा माढा आणि पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या आहेत. सांगलीमध्ये सीएम योगींच्या सभेनंतर अमित शाहांची सुद्धा सभा लावण्यात आली. योगी यांची इचलकरंजीमध्येही सभा पार पडली.

अखेरच्या टप्प्यातही सभांचा धडाका

कोल्हापुरात शाहू महाराजांसाठी एक मे रोजी शिवशाहू निर्धार सभा पार पडली. या सभेतून महाविकास आघाडीसह इंडिया आघाडीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तत्पूर्वी, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची इचलकरंजीमध्येही सभा झाली. आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूर आणि हातकणंगलेत सभा घेतल्या. भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्याही सभा कोल्हापुरात पार पडल्या. इचलकरंजीमध्ये अभिनेता गोविंदानेही सभा घेतली.

सभांमधूनही अंदाज येईना

दोन्ही बाजून झंझावाती प्रचार सुरु असल्याने पश्चिम महाराष्ट्रात किती अस्वस्थता आहे याची प्रचिती आली आहे. फुटलेल्या राष्ट्रवादीचे प्राबल्य आणि शिवसेनतील सुद्धा दोन गटांमधील लढत याच टप्प्यात होणार असल्याने धडाक्यात प्रचार सुरु आहे. त्यामुळे या प्रचाराला भावनिकतेची सुद्धा किनार आहे. बारामतीमध्ये अजित पवारांनी देव पाण्यात घालून प्रचार सुरु केली आहे. त्यांची राजकीय सत्वपरीक्षा असणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राचा अंडर करंट नेमका कोणासाठी आहे याचे उत्तर 4 जून रोजीच मिळणार आहे. प्रचारासाठी लावलेली ताकद पाहता कोणासाठीच अनुकूल वातावरण नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांसह आतापर्यंत पृथ्वीराज चव्हाण, रोहित पवार, रोहित पाटील, बाळासाहेब थोरात यांच्या सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पार पडल्या आहेत. छोट्या छोट्या सभांनी सुद्धा प्रचारामध्ये राळ उडवून दिली आहे. अखेरच्या टप्प्यांमध्ये सुद्धा प्रचारासाठी आणखी नेते दोन्ही आघाड्यांकडून उतरवले जाणार आहेत.

अखेरच्या टप्प्यातही सभांचा धडाका

हातकणंगलेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत बाईक रॅली होणार आहे. दुसरीकडे, गडकरी यांची कोल्हापूरमध्ये सुद्धा संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात व्यापार उद्योजकांसोबत सभा आयोजित करण्यात आली आहे. अमोल कोल्हे शाहू महाराज यांच्यासाठी सभा घेणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी एकहाती प्रचार करत असतानाच त्यांच्या प्रचाराला बळ देण्यासाठी प्रहारचे बच्चू कडू शिराळ्यात सभा घेणार आहेत. संजय राऊत, आदेश बांदेकर यांच्याही सभा होणार आहेत.