Sangli Samachar

The Janshakti News

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा - जिल्हाधिकारी



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ मे २०२४
यंदा हवामान विभागाने सुमारे १०६ टक्के इतका पर्जन्यमानाचा अंदाज वर्तविला आहे. सांगली जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती लक्षात घेता, पूरस्थितीमध्ये संबंधित यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून योग्य नियोजन करावे, जेणेकरून नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागता कामा नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत केले.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, मनपा आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफसह मंत्रालय (मुंबई) येथील अधिकारी श्री. सुमितकुमार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीमध्ये कार्यरत असणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांनी परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, तसेच मोबाईल बंद ठेवू नये. जिल्ह्यात यदाकदाचित पूर परिस्थिती निर्माण झाली तर व्यक्तिंच्या पुनर्वसनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची तसेच चाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी. त्याचबरोबर निवारा केंद्रामध्ये एकत्र कुटुंब कसे राहील याची दक्षता संबंधित यंत्रणेने घ्यावी. शासकीय कार्यालयातील दप्तर पुराच्या पाण्यापासून सुरक्षित ठिकाणी ठेवावे. आपत्कालीन स्थितीमध्ये नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ पंचनामा महसूल यंत्रणेने वेळेत व अचूक करावा. आर. टी. ओ. ने तहसीलनिहाय पोकलेन, जेसीबी, ट्रॅक्टर, तसेच ड्रायव्हर यांची अद्यावत यादी तयार करावी तर जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये निवृत्त सैनिकांसह एनसीसी विद्यार्थ्यांची बचत कार्यात मदत घ्यावी. पूर परिस्थितीमध्ये कार्यरत असणाऱ्या बोटींची तपासणी त्वरित करावी. त्याचबरोबर धोकादायक इमारतींचेही ऑडिट करावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांच्या मदतीकरता पोलीस प्रशासन सज्ज असून आवश्यकता भासल्यास बाहेरून अतिरिक्त मदत घेतली जाईल, अशी ग्वाही जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी यावेळी बोलताना दिली. तत्पूर्वी श्री. नदाफ यांनी आपत्कालीन स्थितीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीच्या आढाव्याचे सादरीकरण केले. जिल्हा परिषद, मनपा तसेच पाटबंधारे विभागाने केलेल्या उपाय योजनांबाबत विभाग प्रमुखांनी यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. याप्रसंगी महानगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 'आपत्ती व्यवस्थापन कार्यप्रणाली - 2024' या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रांतधिकारी, तहसिलदार, न.पा. मुख्याधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी - कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.