Sangli Samachar

The Janshakti News

"ज्याने सुरु केलेय, त्यानेच संपवावे"; उद्धव ठाकरेंच्या युतीत परतण्यावर अमित शाह यांचे मोठे संकेत !



| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २७ मे २०२४
लोककसभा निवडणुकीचे सहा टप्पे संपले आहेत. आता अखेरच्या टप्प्याचे मतदान राहिलेले आहे. अशातच गृहमंत्री अमित शाह यांनी सहाव्या टप्प्यापर्यंत भाजपा ३०० ते ३१० जागा जिंकत असल्याचा दावा केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणावरही भाष्य केले असून त्यांनी याद्वारे उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या राजकारणावर मोठे संकेत दिले आहेत.

२०१९ आणि २०२४ मधील फरक सांगताना शाह यांनी 2019 मध्ये लोकांमध्ये अशी भावना होती की देशाला एक निर्णायक सरकार, निर्णायक नेत्याचा फायदा झाला आणि मोदी जे करत होते ते चांगले होते. तर २०२४ मध्ये भारताला एक महान राष्ट्र बनवण्याचा हा मार्ग आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. एक आत्मविश्वास वाढल्याचे दिसत असल्याचे सांगितले. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत शाह यांनी महाराष्ट्रातील राजकारणावरही भाष्य केले.


महाराष्ट्रात २०१९ मध्ये काय घडले, घडाळ्याचे काटे मागे फिरविता आले तर ते वेगळ्या पद्धतीने करता येतील का, या प्रश्नावर शाह यांनी उद्धव ठाकरे महायुतीत आले तरच्या चर्चांवर उत्तर दिले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभेला आम्हाला बहुमत मिळाले. परंतु शरद पवारांनी आमचे मित्र असलेल्या उद्धव ठाकरेंना आमच्यापासून दूर केले. आम्ही युती म्हणून निवडणूक लढविली होती. आता ज्यांनी हे सुरु केले त्यांनाच ते संपवावे लागेल, असे शाह म्हणाले. तसेच तेव्हा कोणतेही नैतिक प्रश्न, नीतीमत्तेचे प्रश्न उपस्थित केले नाहीत. पत्रकार म्हणूनही हा तुमचा दुटप्पीपणा होता, असे आरोपही शाह यांनी केले.

तसेच उद्धव ठाकरे परत येणार का, या प्रश्नावर शाह यांनी आमची आता शिवसेनेसोबत युती आहे आणि ते ते चांगले काम करत आहेत असे सांगत ठाकरेंना युतीचे दरवाजे उघडे नसल्याचे संकेत शाह यांनी दिले आहेत.

विरोधकांची हवा वाटतेय...

ताकदवर विरोधक नसल्याने यंदाची लोकसभा निवडणूक कंटाळवाणी होईल असे वाटत होते. परंतु गेल्या महिन्यापासून विरोधकांची हवा असल्याचे दिसत आहे. विरोधक जोरदार लढा देत आहेत, अशी कबुलीही शाह यांनी दिली.