| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २८ मे २०२४
राज्यात गेल्या आठवडाभरापासून शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलावरुन चांगलंच राजकारण सुरू आहे. शिक्षणात मनुस्मृतीचा समावेश करण्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया देत असं होत असेल तर आता पालकांनीच विचार करायला हवा, असे म्हटले होते. तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही शिक्षणात मनुस्मृतीच्या सहभागावर भाष्य करताना तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली. बहुजन समाजाचे नेते छगन भुजबळ यांनीही मनुस्मृतीवर भाष्य करताना, मनुस्मृती आम्ही जाळली आहे, चातुर्वर्ण व्यवस्था आम्हाला मान्य नाही, असे म्हटले आहे. आता, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एससीईआरटीने तिसरी ते बारावी इयत्तेच्या अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर केला आहे. त्यानुसार, भाषा विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय पाठ करायला लावावा, अशी शिफारस एससीईआरटीने केली आहे. तर तिसरी ते पाचवीपर्यंत 1 ते 25 मनाचे श्लोक, सहावी ते आठवीसाठी 26 ते 50 मनाचे श्लोक आणि नववी ते बारावीसाठी भगवद्गीतेतील बारावा अध्यायाच्या पाठांतरांची स्पर्धा आयोजित करण्यात यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच काही मानवी मूल्यांची शिकवण देण्यासाठी मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्यात यावा, असा प्रस्ताव असल्याचीही चर्चा पुढे आली. त्यानंतर, राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
शरद पवार, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर आता केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही मनुस्मृतीच्या अभ्याक्रमातील चर्चेवरुन तीव्र संताप व्यक्त केला आहे. रामदास आठवले यांनी फोन करुन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना मनुस्मृतीला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर, शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक घेतले जाणार नसल्याचे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिले आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक घेण्याच्या विषयाला पूर्णविराम मिळाल्याचे दिसून येते.
काय म्हणाले भुजबळ
भाजपने 400 पार चा नारा दिला, त्यामुळे दलित समाजात संविधान बदलणार हे बिंमल गेलं. ते त्यांच्या मनातून काढण्यासाठी नाकी नऊ आले. पंतप्रधान मोदींनाही त्यांच्या अनेक मुलाखतीतून वारंवार संविधान बदलणार नसल्याचं सांगावं लागते. आता नवीन मनुस्मृतीचं आलंय, आता झालं कल्याण. आम्हाला चातुर्वर्ण व्यवस्था मान्य नाही. त्यामुळेच, आम्ही मनुस्मृती जाळली आहे. हे थांबलं पाहिजे, नाहीतर यातून मोठा भडका उडेल, असेही छगन भुजबळ यांनी म्हटलं. पाठ्यपुस्तकातून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद अमंगळ. हे तुकोबांनी सांगितलेलं शिकवलं पाहिजे. पृथ्वी ही शेषनागाच्या फळावर नसून ती श्रमिकांच्या हातावर आहे हे शाळांमधून शिकवलं गेलं पाहिजे. हे नवीन मनुस्मृतीचं काय आलंय? असा सवालही भुजबळ यांनी विचारला.
महात्मा फुले व अण्णाभाऊ साठेंची शिकवण द्या
'हा महाराष्ट्र ज्या महापुरुषांनी घडवला त्या महापुरुषांची शिकवण लहान मुलांना देणे गरजेचे आहे.जे कां रंजले गांजले । त्यासि ह्मणे जो आपुले ॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥ असा उपदेश देणारे तुकाराम महाराज असतील किंवा अवघे विश्वची माझे घर असे शिकविणारे संत ज्ञानेश्वर महाराज असतील. ‘धर्म, राज्य, भेद हे मानवा नसावे, सत्याने वर्तावे इशासाठी’ असे शिकवण देणारे महात्मा फुले असतील किंवा "पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे"! असं ठणकावून सांगणारे अण्णाभाऊ साठे यांची शिकवण मुलांना दिली गेली पाहिजे.'