Sangli Samachar

The Janshakti News

पंचशीलनगर रेल्वे गेट बंद होणार नाही, आमदार सुधीर गाडगीळ;



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ मे २०२४
जुना बुधगाव रोडवरील गेट नंबर १२९ वरील नवीन रेल्वे पुलाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी रेल्वे गेट बंद करणार नाही असे महारेलचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांना माहिती दिली. तसेच सध्या रेल्वे पुलाच्या पीलर चे काम सुरू होणार असून त्यासाठी रोड दुभाजक करून रस्त्याची वाहतूक सुरळीत केली जाणार असून सदर रस्ता डांबरीकरण करून वाहतूक सुरू केली जाईल असेही यावेळी सांगितले त्यामुळे नागरिकांची अजिबात गैरसोय होणार नाही. वाहतुकीचा ताण येऊ नये, याचीही काळजी घेतली जाईल, असे आश्वासन आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिले. पंचशीलनगर परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे नवा पूल उभारणार असून त्यामुळे रेल्वे फाटक बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार गाडगीळ यांनी भेट दिली. नागरिकांसह नवीन रेल्वे पुलाच्या जागेची पाहणी केली. चिंतामणीनगर पुलाचे काम रखडले असून त्यामुळे गैरसोय होत आहे. या मार्गावर रेल्वे आल्यानंतर पंचशीलनगर फाटक बंद केल्याने नागरिकांना बराच काळ तिष्ठत उभारावे लागते. वाहतुकीची कोंडी होते. वाहनधारकांची गैरसोय होत असल्याचे सांगितले. त्यात आता नवीन पुलाच्या कामामुळे रेल्वे फाटक बंद झाल्यास प्रचंड गैरसोय होणार असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.

आमदार सुधीर गाडगीळ यांनी या संपूर्ण मार्गाची पाहणी करुन रेल्वे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रस्तावित नव्या पुलाच्या बांधकामाबाबत माहिती जाणून घेतली. सध्या काम करत असताना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्याचे दुभाजक केले जातील. वाहतूकीला कोणताही अडथळा न होता रेल्वे पुलाच्या पीलरचे काम सुरू होणार आहे. पूलाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या रेल्वे गेटला अंडरपास होणार आहे. त्यानंतर रेल्वे गेट बंद होणार आहे. त्यामुळे नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही. रेल्वे गेट बंद होणार ही माहिती चुकीची असल्याने नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये. नागरिकांनी निश्चिंत राहावे, असे आवाहन आमदार गाडगीळ यांनी केले. यावेळी माजी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी, माजी नगरसेवक संजय यमगर, आयुब पटेल, संदीप थोरात, महारेल अधिकारी साई प्रताप तसेच ठेकेदार वैभव कौलगुड आदी भागातील नागरिक व अधिकारी उपस्थित होते.


चिंतामणीनगर येथील रेल्वे पुलाचे कामही लवकरात लवकर पूर्ण करा असे रेल्वे अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांना आमदार गाडगीळ ह्यांनी सांगितले. त्यावर आम्हीही प्रयत्नशील असून जून अखेर रेल्वे पुलाची काम पूर्ण होईल असे संबंधित ठेकेदार यांनी सांगितले आहे, अशी माहिती यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली....