Sangli Samachar

The Janshakti News

संजयकाकांसाठी बुलेट तर विशाल पाटलांसाठी युनिकॉर्न लागली दाव्याला !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ मे २०२४
देशासह राज्यात सोमवारी (13 मे) चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे. मात्र याआधी तिसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या सांगली मतदारसंघ चर्चेत आला आहे. कारण याठिकाणी काही कट्टर कार्यकर्त्यांनी आपला उमेदवार विजयी झाल्यानंतर आपण काय करू शकतो, याची झलक दाखवून दिली आहे. सध्या या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या नाव असलेले पत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. या दोघांच्या कट्टर कार्यकर्त्यांनी पैज लावल्याचे दिसत आहे.


संपूर्ण देशभरात आणि राज्यभर लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत असणारा सांगली जिल्हा आता अजून एका गोष्टीने चर्चेत येणार आहे. नुकतेच सांगली लोकसभेचे मतदान पार पडले त्यावेळी बऱ्याच गोष्टी आतून आणि बाहेरून घडल्याने सर्वजण चिंतेत आहेत. त्यातच काही कट्टर कार्यकर्त्यांनी आपला उमेदवार विजयी झाल्यानंतर आपण काय करू शकतो, याची झलक व्हायरल होत असेलल्या पत्रातून दाखवून दिली आहे.

महायुतीचे संजय काका पाटील यांच्यासाठी रमेश संभाजी जाधव या तरुणाने त्याची युनिकॉर्न गाडी क्रमांक 8800 ही दाव्यावर लावली आहे. अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे निवडणूक जिंकले तर ही गाडी गौस मुबारक मुलाणी या व्यक्तीला दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे गौस मुबारक मुलाणी यांनीही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी आपली बुलेट पणाला लावली आहे. जर का संजय काका पाटील हे निवडून आले तर त्यांची बुलेट क्रमांक 1126 ही गाडी रमेश संभाजी जाधव या तरुणास दिली जाणार आहे. असे दोघांनीही लेखी आश्वासन एकमेकांना दिले असून त्यावर साक्षीदार म्हणून इतर तिघांची नावे आहेत.

अशा आगळ्यावेगळ्या पैजेमुळे सांगली जिल्हा पुन्हा एकदा संपूर्ण देशभरात वेगळ्याच कारणाने चर्चेत येणार आहे. कारण आतापर्यंत आपण पैजा या पैशांवर लागलेल्या पाहिल्या आहेत, परंतु प्रथमच मालकीच्या वाहनांवर पैज लागल्याचे यला मिळत आहे. या सर्वांचा निकाल चार जूनलाच लागणार असला तरी सुद्धा या पैजेची चर्चा बरेच दिवस चालणार आहे. आपापल्या नेत्यांसाठी कार्यकर्ते कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. मतदान झाल्या दिवसापासून या मतदारसंघात उलट सुलट चर्चा सुरू आहेत. काका की दादा यावरच मतदार आणि नागरिक चर्चा करताना दिसून येत आहेत.