yuva MAharashtra सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांतील अवैध होर्डिंग्ज हटवण्याचा आयुक्त शुभम गुप्ता यांचा आदेश !

सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांतील अवैध होर्डिंग्ज हटवण्याचा आयुक्त शुभम गुप्ता यांचा आदेश !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ मे २०२४
महापालिका क्षेत्रातील सर्व होर्डिंग्जचे पुढील ८ दिवसांत त्रयस्थ तज्ञांच्या वतीने 'स्ट्रक्चरल ऑडिट' (बांधकाम रचना लेखापरीक्षण) करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. मुंबई येथील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील सर्व महापालिकांना याविषयीचे आदेश दिले आहेत.

आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले की, राज्य सरकारचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार १५ मे या दिवशी प्रशासनाधिकार्‍यांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. 'स्ट्रक्चरल ऑडिट' करून प्रत्येक होर्डिंगची पडताळणी केली जाईल. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करतांनाच सदोष होर्डिंग्ज तात्काळ हटवले जातील. वैध आणि अवैध होर्डिंग्ज निश्चित करून त्यानुसार कारवाई होईल. अवैध होर्डिंग्ज असतील, तर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यासाठी महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा समवेत असेल. पावसाळ्यात हे काम तातडीने पूर्ण करून पुढील ८ दिवसांत याविषयीचा अहवाल प्राप्त होईल.


महापालिकेच्या जागेत एकूण ८६ होर्डिंग्ज आहेत. त्याचे कंत्राट देण्यात आले आहे. खासगी मालमत्ता किंवा जागेत १३० होर्डिंग्ज आहेत. मध्यंतरी एका स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केल्यानंतर राज्यातील अवैध होर्डिंग्जचे सर्व्हेक्षण झाले होते. त्या वेळी अनेक होर्डिंग्ज हटवण्यात आली होती.