Sangli Samachar

The Janshakti News

8 महिन्यांचा पगार बोनस म्हणून दिला! 16530 कोटींचा नफा 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांमध्ये वाटला !| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १७ मे २०२४
सामान्यपणे सणासुदीला किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला कंपन्यांकडून बोनस दिला जातो. हा बोनस म्हणजे एक किंवा दोन महिन्यांचा पगार असतो जगभरातील अनेक कंपन्या नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला मागील वर्षाच्या कंपनीच्या नफ्यातील वाटा 'व्हेरिएबल पे' म्हणून एक रक्कमी पैसे कर्मचाऱ्यांना देतात. मात्र सध्या जगभरात एका कंपनीची तुफान चर्चा आहे. कारण या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना तब्बल 8 महिन्यांचा पगार बोनस म्हणून दिला आहे. ही कंपनी कोणती आहे आणि त्यांना असा किती नफा झालाय पाहूयात...

ही कंपनी कोणती जिने मागील वर्षापेक्षा अधिक नफा कंपनीने कमवला

ज्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना 8 महिन्यांचा पगार बोनस म्हणून दिला आहे त्या कंपनीचं नाव आहे, सिंगापूर एअरलाइन्स लिमिटेड! सिंगापूरमधील सर्वात मोठ्या विमान वाहतूक कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना 8 महिन्यांचा पगार बोनस म्हणून दिल्याचं वृत्त 'ब्लुमबर्ग' वृत्तसंस्थेनं दिलं आहे. सलग दुसऱ्या वर्षी कंपनीला घसघशीत नफा झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षाच्या कमाईपेक्षा यंदाच्या वर्षी कंपनीने अधिक नफा कमावला आहे. त्यामुळेच कंपनीने नफ्यामधून 6.65 महिन्यांचा पगार कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून दिला असून साथीच्या काळातील भरपाई म्हणून 1.5 महिन्यांचा अतिरिक्त पगार प्रत्येक कर्मचाऱ्याला देण्यात आला आहे. यावर सिंगापूर एअरलाइन्सने थेट कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. 


कंपनीचा निव्वळ नफा 16530 कोटींहून अधिक

आर्थिक वर्ष 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये मागील वर्षापेक्षा 24 टक्के अधिक नफा कमवला आहे. कंपनीने कमवलेला नफा हा 2.67 बिलियन सिंगापूर डॉलर्स इतका आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार हा नफा 16530 कोटींहून अधिक रुपयांचा आहे. साथीच्या आजारानंतर परिस्थिती सर्वसामान्य होत असताना विमान प्रवासाची मागणी वाढत आहे. त्यामुळेच कंपनीला सातत्याने नफा होत आहे. कंपनीच्या कार्गे सेवेलाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कोरोनासंदर्भातील निर्बंध उठल्यानंतर कंपनीला उत्तम प्रतिसाद मिळत असून विमानांच्या फेऱ्यांमधील मागणी वाढत आहे. मार्च महिन्यामध्ये या विमान कंपनीच्या 97 टक्क्यांहून अधिक विमानं पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करत होते. 

या कंपनीनेही कर्मचाऱ्यांना दिला पाच महिन्यांचा बोनस

केवळ सिंगापूर एअरलाइन्स नाही तर एमिरिट्स एअरलाइन्सनेही त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांचा बोनस दिला आहे. एमिरिट्सला 5.1 बिलियन अमेरिकी डॉलर्सचा नफा झाला त्यातून त्यांनी कर्मचाऱ्यांना हा बोनस दिला.