Sangli Samachar

The Janshakti News

सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल ! कोणाचा ? यामुळे काय होणार ?| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ४ मे २०२४
पृथ्वीपासून सुमारे २२.५३ कोटी कि.मी. अंतरावरील एका लघुग्रहावरील एका रहस्यमयी सिग्नलचा वेध घेण्यात 'नासा'ला यश आले. हे अंतर थोडथोडके नव्हे, तर पृथ्वीपासून सूर्याच्या अंतरापेक्षा दीडपट असल्याचे ' नासा'ने म्हटले आहे. नासाच्या या कामगिरीमुळे अवकाशातील डेटा सिग्नलरूपात मिळवून त्यावर संशोधन करणे शक्य होणार आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये नासाने सूर्यमालेत विविध धातूंपासून तयार झालेल्या 'सायके १६' या गुरू व मंगळ ग्रहांदरम्यान असलेल्या लघुग्रहाच्या अभ्यासासाठी अवकाश मोहीम राबविली होती. त्यासाठी पाठविलेल्या 'सायके' यानामध्ये अवकाशातील कोट्यवधी किलोमीटरवरील सिग्नलचा वेध घेण्यासाठी तसेच लेझर सिग्नलद्वारे माहितीचे आदानप्रदान करण्यासाठीची यंत्रणा खास 'डीप स्पेस ऑप्टिकल कम्युनिकेशन' प्रणालीने सुसज्ज आहे.

याच प्रणालीने सुमारे २२.५३ कोटी किलोमीटरवरून महत्त्वाची माहिती रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्समीटरसह इंटरफेस केल्यानंतर पृथ्वीवर पाठविली. लेसर सिग्नलद्वारे आलेला जवळपास १० मिनिटांचा डेटा डानऊलिंक करण्यात यश आले. त्यावर आता अभ्यास सुरू आहे.

...तर हायस्पीड डेटाही पाठवता येईल

८ एप्रिलला घेतलेल्या चाचणीत आम्ही २५ एमबीपीएसच्या वेगाने डेटा ट्रान्समिशनची चाचणी घेतल्याचेही त्यांनी म्हटले. लेझर ट्रान्सरिसिव्हरच्या डाऊनलिंकचा वापर केल्यास हा डेटा २६७ एमबीपीएसच्या वेगाने प्रसारित करता येणे शक्य आहे. अंतराळयान सध्या खूप दूर असल्याने, डेटा ट्रान्समिशनचा वेग कमी असल्याचे संशोधक मीरा श्रीनिवासन यांनी म्हटले.

अंतराळातील माहिती उलगडणार ?

नासाच्या या कामगिरीमुळे अंतराळ आणि पृथ्वी यांच्यातील लेझर ट्रान्समिशनद्वारे होणाऱ्या सिग्नलचा अभ्यास करता येणार आहे. त्यामुळे अंतराळातील नवनव्या माहितीचा उलगडा होईल. त्यातून अवकाश संशोधनाला आणखी गती मिळू शकेल, असे नासाने म्हटले आहे.