Sangli Samachar

The Janshakti News

न्यूरालिंक प्रोजेक्ट धोक्यात? रुग्णाच्या मेंदूत बसवलेल्या चिपमध्ये तांत्रिक अडचणी !| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ९ मे २०२४
इलॉन मस्कची ब्रेन टेक्नॉलॉजी कंपनी न्यूरालिंकने काही महिन्यांपूर्वीच एका रुग्णाच्या डोक्यात चिप बसवली होती. मात्र, या उपकरणात काही तांत्रिक अडचणी आल्या असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. एका ब्लॉग पोस्टद्वारे न्यूरालिंकने हे अपडेट शेअर केलं आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीमध्ये रुग्ण नोलँड अर्बाऊघ (Noland Arbaugh) यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतरच्या काही आठवड्यांत, मेंदूच्या ऊतीमध्ये बसवलेल्या इलेक्ट्रोडयुक्त धाग्यांपैकी काही धागे त्या ऊतीपासून बाहेर येऊ लागले. यामुळे, हे उपकरण व्यवस्थित काम करत नव्हते, असे कंपनीने स्पष्ट केले.


न्यूरालिंकने काय उपाय केला ?

कंपनीने सांगितलं, की त्यांनी सॉफ्टवेअरमध्ये केलेल्या दुरुस्तीच्या माध्यमातून या त्रुटीची भरपाई केली. सॉफ्टवेअरच्या बदलामुळे "नोलँड सुरुवातीच्या कामगिरीपेक्षा अधिक जलद आणि टिकून राहणारी कामगिरी करू शकत आहे", असं कंपनीने स्पष्ट केलं

आता पुढे काय ?

न्यूरालिंकने दिलेल्या माहितीनुसार, ते सध्या या उपकरणासाठी मजकूर प्रविष्ट करणे आणि कर्सर नियंत्रण सुधारण्यावर काम करत आहेत. अशाच प्रकारे रोबोटिक हात आणि व्हीलचेअर अशा वास्तविक जगातील उपकरणांना वापरण्यासाठी देखील हा रुग्ण सक्षम व्हावा यादृष्टीने कंपनी काम करत आहे.

शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंता

सेंट लुईस येथील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधील न्यूरोसर्जन एरिक ल्यूथर्ड्ट यांनी ब्लूमबर्गला सांगितले, "इंजिनिअर्स आणि शास्त्रज्ञ हे विसरतात की, मेंदू इंट्राक्रॅनियल जागेमध्ये किती हालचाल करतो. तुम्ही तुमच्या डोक्याची थोडीशी जरी हालचाल केली, तरी आतील पेशी किंवा उती या कित्येक मिलीमीटर पर्यंत हालचाल करू शकतात."

पॅराड्रोमिक्स ही दुसरी एक कंपनी देखील ब्रेन इम्प्लांटवर काम करत आहे. या कंपनीचे सीईओ मॅट एंजल यांनीदेखील याप्रकरणी चिंता व्यक्त केली. चिपमधील धागे जर बाहेर येत असतील तर ही नक्कीच सामान्य बाब नाही, असं ते म्हटले.