Sangli Samachar

The Janshakti News

निवडणूक प्रचारासाठी सामान्य कार्यकर्त्यांसह मजुरांचे भाव वधारले



सांगली समाचार - दि ८ एप्रिल २०२४
मुंबई - लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून प्रचाराला मात्र सामान्य कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याने वरिष्ठांची मात्र चांगलीच दमछाक होत आहे. पाच वर्षे झोपेत होते आणि आज आमची आठवण कशी काय झाली, असल्या प्रश्नांची बरसात होत असल्याने पक्षश्रेष्ठींची चांगलीच तारांबळ उडत आहे. अशातच कोण निवडून येईल, आल्यावर कुठे जाईल, किती संपत्ती गोळा करेल याची हमी कोण देणार, पाच वर्षे आम्हाला कोण विचारणार, आमचा वाली कोण, असल्या प्रश्नांची उत्तरे कोणताही पक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे सामान्य कार्यकर्ता मात्र यापासून दूर जाताना दिसत आहे.


तथापि, मजूर कार्यकर्ते ही कल्पना उदयास आली असून त्या अनुषंगाने वाटचाल करताना मजुरांचेही भाव वधारले असून दोन वेळेस जेवण व फराळाचीही अट असल्याने हॉटेल ढाबे व खानावळींमध्ये मोठी गर्दी बघायला मिळते. मजूर कार्यकर्ते केवळ आपल्या मजुरीशी प्रामाणिक. त्यांना पक्ष आणि उमेदवाराशी काही घेणेदेणे नसल्याचे बोलले जाते, त्यामुळे शक्तीप्रर्दशनाच्या भरवशावर कोणी गैरसमज करून घेऊ नये. खेडोपाडी शेतातील कामे आटोपली त्यामुळे मजूर वर्गाला कामे नव्हती, आता हे निवडणुकीचे मोठे काम मिळाल्याने मजूर वर्ग मात्र समाधानी आहे.