Sangli Samachar

The Janshakti News

एका झिरोने बिघडवले सगळं गणित, बारामतीमध्ये करोडो रुपयांची जमिन झाली लाखांची



सांगली समाचार - दि ४ एप्रिल २०२४
बारामती - एका झिरोची किंमत कायम झिरोच असते. मात्र एखाद्या आकड्यापुढे झिरो वाढला किंवा काढून घेतला तर त्या आकड्याची किंमत मात्र बदलते. यामुळे एखाद्याचं नशीब चमकू शकते किंवा पूर्णपणे बदलते. असाच प्रकार पुणे जिल्ह्यातील बारामती शहरामध्ये समोर आला आहे. शहरातील नव्याने हद्दवाढ झालेल्या जमिनीचे रेडीरेकनरचे दर मूल्यांकनामध्ये कोणताही बदल न करता 'जैसे थे' ठेवण्यात आले आहेत. परंतु मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने रेडीरेकनर दरामधील सूचीमध्ये एक शुन्य कमी केल्याने करोडो रुपयांच्या जमिनीचे मूल्यांकन थेट लाखांमध्ये झाले आहे. यामुळे बारामतीमध्ये मुद्रांक शुल्क विभागाचा अजब कारभार समोर आला आहे.

बारामती शहरातील हद्दवाढ झालेल्या वाढीव क्षेत्रामध्ये २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षाकरिता रेडी रेकनरच्या दरात कोणतेही बदल न करता ते जैसे थे ठेवण्यात आले आहेत. परंतु, बारामतीच्या शहरातील जळोची क्षेत्रातील सर्वे नंबर २३२, २३३, २३४, २३५, २३६, २४०, २४५, २४७, २४८, २४९, २५० आणि २८२ या गटाकरिता ३९०० चौरस मीटर रेडी रेकनर चा दर होता. परंतु, सध्याच्या दर पत्रकात ३९० चौरस मीटर मूल्यांकन केले जात आहे. 


तसेच नव्याने निवासी विभागात समाविष्ट झालेल्या सर्वे नंबर जमिनी गट क्रमांक २४, २६, २७, २८, २९, ३०, ३१, ३२, ३३, ३४, ३५, ३६, ३७ आणि २३१ याकरिता प्रति चौरस ३२०० रुपये रेडी रेकनर दराऐवजी ३२० चौरस मीटर मूल्यांकन दर सूचीमध्ये दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील करोडो रुपये जमिनींचे मूल्यांकन थेट लाखात झाले आहे. मुद्रांक शुल्क विभागाकडे बारामती शहरातील जितेंद्र जाधव यांनी त्यांच्या जमिनीचे मूल्यांकन करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सदर प्रकार समोर आला आहे. या संदर्भात जाधव यांनी दुय्यम निबंधक कार्यालयाला लेखी पत्र दिले असून याची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.