Sangli Samachar

The Janshakti News

पृथ्वीच्या पोटात 'महासागर'; 700 किलोमीटर खाली आढळला पाण्याचा नवा साठा



सांगली समाचार दि ४ एप्रिल 
मुंबई  - अनेक वैज्ञानिक शोध आणि मिळालेल्या उपलब्धींनी जगाला मंत्रमुग्ध केले आहे. ज्यामध्ये मग सुपरमॅसिव्ह ब्लॅक होलपासून ते आतापर्यंतच्या सर्वोच्च तापमानापर्यंत पोहोचलेल्या दक्षिण कोरियाच्या फ्यूजन रिॲक्टरपर्यंत, अशा शोधांनी खरंच चकीत केले आहे. आपण शाळेत असताना शिकलो आहोतच की, पृथ्वीवर सुमारे 71 टक्के पाणी आहे. यामध्ये महासागर, नद्या, तलाव यांच्या पाण्याचा समावेश होतो. आता नुकत्याच लागलेल्या एका शोधामुळे पृथ्वीवर पाण्याचा नवीन स्रोत सापडला आहे. अमेरिकेतील इलिनॉय येथील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली पाण्याचे प्रचंड साठे शोधून काढले आहेत. विशेष म्हणजे, पृथ्वीच्या आत असलेले पाणी तिच्या पृष्ठभागावर असलेल्या पाण्याच्या तिप्पट असू शकते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 700 किलोमीटर खाली पाण्याचा नवीन साठा सापडला आहे.

एका रिपोर्टनुसार, पृथ्वीवरील पाण्याच्या उत्पत्तीचे संकेत शोधत असताना वैज्ञानिकांना ही माहिती मिळाली. त्याला रिंगवूडाइट (Ringwoodite) नावाच्या मिनरलच्या आत लपलेल्या महासागराची माहिती मिळाली. या संशोधनामुळे पृथ्वीवरील जलचक्र समजून घेण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे, सापडलेले पाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेल्या एकूण पाण्यापेक्षा तिप्पट आहे.


नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ स्टीव्हन जेकबसेन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, आम्हाला पृथ्वीवरील पाणी पृथ्वीच्या आतून आल्याचे विश्वासार्ह पुरावे मिळाले आहेत. त्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी, शास्त्रज्ञांनी अमेरिकेत स्थापित 2000 सिस्मोग्राफ वापरले. त्यांनी गेल्या 500 भूकंपांचा अभ्यास केला आणि त्यांच्या लहरींचे परीक्षण केले. भूकंपाच्या लहरींचा पृथ्वीच्या गाभ्यामधून गेल्यावर त्यांचा वेग कमी झाला. यावरुन पृथ्वीच्या आतील खडकांमध्ये पाणी असल्याचे उघड झाले.