Sangli Samachar

The Janshakti News

मोटारीवर डॉक्टरचा लोगो लावून दारू तस्करी, दीड लाखाची दारू जप्त



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२८ एप्रिल २०२४
डॉक्टरांचा लोगो लावून गोवामेड दारूची तस्करी करणारी मोटार राज्य उत्पादन शुल्कने बोलवाड (ता.मिरज) जवळ शुक्रवारी दुपारी पकडली. १ लाख ४५ हजाराचे विदेशी मद्य व मोटार असा ५ लाख ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. वाहन चालक अजित मुरग्याप्पा कट्टीकर (वय २४, रा. लक्ष्मीनगर, मालगाव, ता. मिरज) याला अटक केली.

अधिक माहिती अशी, लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभाग अधिक सतर्क झाला आहे. बेकायदा दारूची वाहतूक होऊ नये म्हणून भरारी पथकासह इतर पथक कार्यरत आहे. मिरज ते बोलवाड रस्त्यावर शुक्रवारी दुपारी बेकायदा दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर बोलवाड ते मिरज रस्त्यावर सापळा रचला. यावेळी बोलवाड येथे मोटार (एमएच १० एएन ३७९४) चा पाठलाग करून अडवली. संशय येऊ नये म्हणून मोटारीच्या पाठीमागील बाजूस डॉक्टरांचा लोगो लावला होता. 


पथकाने मोटारीची तपासणी केली. तेव्हा मागील बाजूस डिकीमध्ये ६९६ वेगवेगळ्या कंपनीच्या बाटल्या आढळल्या. एकुण १३८.९६ बल्कलीटर विदेशी दारूसाठा जप्त केला. जप्त केलेला दारूसाठा फक्त गोवा राज्यात निर्माण केला जातो. तसेच तो फक्त गोव्यातच विक्री करण्यास परवानगी दिली जाते. उत्पादन शुल्कने १ लाख ४५ हजाराचा दारूसाठा व मोटार असा ५ लाख ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. चालक अजित कट्टीकर याला अटक करून त्याच्याविरूद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे, उपअधीक्षक ऋषिकेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक सुपे, दुय्यम निरीक्षक अजय लोंढे, जितेंद्र पवार, सहायक दुय्यम निरीक्षक शरद केंगारे, जवान स्वप्नील आटपाडकर, संतोष बिराजदार आदींच्या पथकाने कारवाई केली.