| सांगली समाचार वृत्त |
शिरोळ - दि.२८ एप्रिल २०२४
लोकसभा निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सहा देशांमध्ये कांद्याची निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. याचे स्वागत करत हातकणंगलेचे लोकसभा उमेदवार राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली आहे. धडाधड त्यांचे उमेदवार पाडा, त्याशिवाय हेच काय कुठलेही सरकार कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही, अशी टीका शेट्टी यांनी केली आहे.
निर्यातीला परवानगी द्यायचीच आहे तर सर्व अटी काढून टाका. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरीकांदा निर्यातबंदीच्या विरोधात आंदोलन करत होते. वारंवार सरकारकडे निवेदने जात होती, आंदोलने होत होती. शेतकरी रस्त्यावर उतरत होते पण सरकार ऐकायला तयार नव्हते. जशा लोकसभेच्या निवडणुका आल्या व भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांचे उमेदवार पराभूत होणार अशी लक्षणे दिसताच सरकार जागे झाले आहे, असा आरोप शेट्टी यांनी भाजपावर केला आहे.
आधी गुजरातमधील दोन हजार टन पांढरा कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली. यावर टीकाटिप्पणी सुरु झाल्यानंतर आता 99 हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, पण हा फार उशिराने घेतलेला निर्णय आहे. निर्यातीला परवानगीच द्यायची आहे तर अटी कशाला घालता? असा सवाल करत शेट्टी यांनी जेवढा कांदा निर्यात व्हायचा तेवढा होऊ दे त्यावरील बंधन काढून टाकावी अशी मागणी केली आहे.
तसेच शेतकऱ्याने डोळे वटारल्यानंतर जर सरकार घाबरत असेल तर धडाधड त्यांचे उमेदवार पाडा. त्याशिवाय हेच काय कुठलेही सरकार कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही असे आवाहनही शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केले आहे.