Sangli Samachar

The Janshakti News

विशाल दादा : काँग्रेस पक्षाविरुद्ध बंडखोरी करणारा दादा घराण्यातील पहिला बंडखोर !| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.१६ एप्रिल २०२४
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव दादा पाटील यांच्या घराण्यातून पहिल्यांदा पक्षाच्या विरोधात बंड होतय.दादा घराणे आणि काँग्रेस हे समीकरण आजवर राहिले. पण महाविकास आघाडीच्या राजकारणात दादांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी मिळणार नाही असे चित्र आहे. या परिस्थितीत विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे.

तसं पाहायला गेलं तर दादा घराण्यातील ही पहिली बंडखोरी नाही. यापूर्वी मदन भाऊ पाटील यांनी काँग्रेस पक्षाविरुद्ध बंडाचा झेंडा फडकवला होता. आणि त्यांनी विजयही संपादन केला होता. त्यानंतरच्या निवडणुकीत काँग्रेस समोर तगडा उमेदवार नसल्यामुळे काँग्रेस श्रेष्ठींनी भाऊंना पाचारण करून पक्षाचे तिकीट दिले होते. हा इतिहास आहे त्यामुळे आत्ताही विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाने त्यांच्याविरोध कारवाई केल्यास, भविष्यात विशाल दादा पुन्हा सन्मानाने काँग्रेसवासी होऊ शकतात. आणि म्हणूनच विशाल दादांचे बंड हे विजय बंड ठरू शकते.

सांगलीतून काँग्रेस पक्षांची उमेदवारी विशाल पाटील यांना मिळावी म्हणून माजी मंत्री डॉ विश्वजित कदम यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली पण महाविकास आघाडीच्या इतर मित्रपक्षातील नेत्यांचे आणि काँग्रेसमधील बड्या नेत्यांचे मैत्रसंबंध यामुळे विश्वजित कदम यांच्याही शब्दाचा मान राखला गेला नाही असेही बोलले जाते..


सांगली जिल्ह्यात काँग्रेसचे राज्यपातळीवर कार्यरत असलेले नेते डॉ विश्वजित कदम यांनाही पक्षाच्या अंतर्गत प्रतिस्पर्धीनी सांगली उमेदवारीबाबत शह दिला ही बाब सुद्धा चर्चेत असून त्यांचे पडसाद आगामी निवडणुकीत उमटणार काय असाही प्रश्न आहे..

विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील,जयश्रीताई पाटील हेच सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आहेत. याचे नेतृत्व डॉ विश्वजित कदम करत आहेत. हे सर्व नेते म्हणजेच काँग्रेस आहेत..या सर्व नेत्यांनी सामूहिक प्रयत्न करूनही महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्ली काँग्रेस यांनी दाद दिली नाही या सगळ्या घटनाचा सांगली जिल्हातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर परिणाण झाला आहे, त्यांचे पडसाद दोन दिवसापूर्वी काँग्रेस बोर्डाला चुना फासून उमटले होते..

या सर्व नाराजीच्या वातावरणात महाविकास आघाडी सांगली लढत आहे त्याचवेळी विशाल पाटील बंडखोरी करत आहेत.. सांगली जिल्ह्यात बंडखोरीचा वारसा जुना आहे. पतंगराव कदम, शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, संपतराव देशमुख, राजेंद्र अण्णा देशमुख, सदाशिवराव पाटील या नेत्यांनी बंड करून राजकीय सुरुवात केली आहे. या नेत्यांचे बंड यशस्वी झालेही आहे. पतंगराव कदम, शिवाजीराव नाईक आणि अजितराव घोरपडे यांना तर मंत्रीपदावर काम करण्याची संधी मिळाली होती.

सांगली जिल्ह्याला बंडाचा इतिहास आहे. बंडाला स्थान देणारा जिल्हा आहे. याच मार्गाने आता क्रांतिवीर वसंतराव दादांचा नातू निघाला आहे. मतदारांचेही ठरले आहे आता दादांचा वारस पुन्हा एकदा संसदेत जाणारही ! आणि संसद गाजवणारही...

(फेसबुक वॉलवरून साभार)...