Sangli Samachar

The Janshakti News

फक्त पैशांच्या हव्यासापोटी सांगलीत बांधकाम व्यावसायिकाचा घोटला गळा; पोलिसांसमोर होतं मोठं आव्हान, पण..| सांगली समाचार वृत्त |
 सांगली- दि.२५ एप्रिल २०२४
अपहरणापासून ते खून करण्यापर्यंत कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती नव्हता. त्यामुळे तपासाचे आव्हान पोलिसांसमोर होते. 'मुजरिम कितना भी शातीर हो, वो कोई न कोई सुराग पीछे छोडही जाता है!' हा डायलॉग ऐकलाच असेल. 

मात्र, या वेळी पोलिसांकडे कोणताही 'सुराग' नव्हता. अपहरण, त्यानंतर नदीपात्रातून आलेल्या मृतदेहाचे गूढ कायम होते. पोलिस  बारा दिवस जंग-जंग पछाडत होते. खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर कौशल्यपूर्ण तपासाआधारे तिघांना ताब्यात घेतले. केवळ पैशांच्या हव्यासापोटी सांगलीतील बांधकाम व्यावसायिकाचा गळा घोटल्याची कबुली त्यांनी दिली. त्यानंतर त्यांना बेड्या ठोकल्या. 


तीन वर्षांपूर्वीची ही घटना आहे. बांधकाम व्यावसायिक माणिकराव विठ्ठल पाटील हे सांगलीचे. माणिकरावांचे १३ ऑगस्ट रोजी तुंग (ता. मिरज) येथून अपहरण झाल्याची फिर्याद त्यांच्या मुलाने ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी तपास सुरू केला. चार दिवसांनंतर त्यांचा मृतदेह कवठे पिरान येथे वारणा नदीपात्रात आढळला. खून झाल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसदल खडबडून जागे झाले. 

अपहरणापासून ते खून करण्यापर्यंत कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती नव्हता. त्यामुळे तपासाचे आव्हान पोलिसांसमोर होते. तत्कालीन पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी तपासाच्या सूचना दिल्या. 'एलसीबी'चे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वखालील पथक नेमले. प्रथमदर्शनी पैशांच्या कारणातून खून झाला असावा, असा संशय पोलिसांना बळावला. त्याअनुषंगाने तपास सुरू केला. तीनशेवर जणांची चौकशी केली. तपासात तो संशय खरा ठरलाच. अखेर गोपनीय खबरे आणि तांत्रिक तपासातून तिघांची नावे समोर आली. चौकशी केल्यानंतर खुनाची कबुली दिली.

त्यातील संशयिताने काही जणांकडून पैसे घेतले होते. त्यांनी पैशांचा तगादा लावला होता. त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे त्याने दोघांच्या मदतीने अपहरण करून खंडणी उकळण्याचे ठरवले होते. त्यानुसार बांधकाम व्यावसायिक पाटील यांना प्लॉट दाखवण्यासाठी म्हणून बोलवून घेतले. त्या वेळी संशयितांची आणि त्यांची झटापट झाली. दंगा झाल्यानंतर संशयितांनी माणिकराव यांचा गळा घोटला. 

त्यानंतर तिघांनी त्यांचे हात दोरीने बांधून त्यांच्याच चारचाकीच्या डिकीत टाकले. घाबरलेल्या तिघांनी कुंभोज पुलावरून माणिकराव यांना नदीत टाकले. तेथून पसार झाले. एकही पुरावा पोलिसांच्या हाती नव्हता. तपासात अंमलदार संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, संदीप नलवडे, बिरोबा नरळे, सागर टिंगरे, अनिल कोळेकर यांचा सहभाग होता. या टीमचा गौरव करण्यात आला.