Sangli Samachar

The Janshakti News

आता वेटींगची झंझट राहणार नाही ! रेल्वेमंत्रीच म्हणाले, सर्व प्रवाशांना कन्फर्म तिकीट ?



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि.२५ एप्रिल २०२४
रेल्वेने प्रवास करणाऱ्या अनेकांना कन्फर्म तिकीट मिळण्यात अडचणी येतात. सोशल मीडियावरही लोक अनेकदा याबाबत तक्रार करतात. अनेकवेळा असे घडते की, खूप आधी बुकिंग करूनही त्यांचे तिकीट वेटिंगमध्येच राहते. मात्र, आता ही समस्या मुळापासून दूर करण्याच्या दिशेने सरकार प्रयत्नशील आहे. रेल्वे मंत्री आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणतात की येत्या पाच वर्षांत जवळपास सर्व प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणे सुरू होईल. ते म्हणाले की, रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला कन्फर्म तिकीट मिळावे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे.

आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय मंत्री म्हणाले, 'पुढील पाच वर्षांत रेल्वेची क्षमता इतकी वाढवली जाईल की ज्याला रेल्वेने प्रवास करायचा असेल त्याला कन्फर्म तिकीट सहज मिळू शकेल.' गेल्या दशकात रेल्वेच्या विकासाचा वेग लक्षणीय वाढला आहे, असेही ते म्हणाले.


याचे उदाहरण देताना वैष्णव म्हणाले की, 2004 ते 2014 या काळात केवळ 17,000 किलोमीटरचे रेल्वे ट्रॅक बांधण्यात आले. त्याच वेळी, 2014 ते 2024 पर्यंत 31,000 किलोमीटरचे नवीन ट्रॅक तयार करण्यात आले. 2004 ते 2014 दरम्यान सुमारे 5,000 किमी रेल्वेचे विद्युतीकरण करण्यात आले, तर गेल्या 10 वर्षांत 44,000 किमी रेल्वेचे विद्युतीकरण करण्यात आले. 2004-2014 पर्यंत केवळ 32,000 डबे बांधले गेले. गेल्या 10 वर्षांत 54,000 डबे तयार करण्यात आले आहेत.