सांगली समाचार - दि. ११ एप्रिल २०२४
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. एका बाजूला उद्धव ठाकरे यांनी पै. चंद्रहार पाटील यांच्या रूपाने आपला उमेदवार मैदानात उतरवला आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यानी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. परंतु काँग्रेसची गाडी इशाऱ्याची शिट्टी देत समझोत्याच्या स्टेशनवरच उभी असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. काल पलूस येथे एका पत्रकार बैठकीमधून डॉ. विश्वजीत कदम यानी काँग्रेस हाय कमांड व उद्धव ठाकरे यांना सांगलीच्या जागेबाबत पुनर्विचार करण्याचे कळकळीचे आवाहन केले. अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी ते फेटाळून लावले. पातळीवरील काँग्रेस नेत्यांनी "मोदी विरोधात एकत्र येऊन आपल्याला लढायचे आहे अशा वेळेला कोणताही आता ताई निर्णय न घेता आघाडी धर्म पाळावा." हेच तुणतुणे वाजवले.
गेली दोन महिने जिल्ह्यातील नेते मंडळी 'सांगलीची काँग्रेसची हक्काची जागा आपल्यालाच मिळावी' म्हणून मुंबई, दिल्ली, नागपूर या ठिकाणी भेट घेऊन वरिष्ठांच्या नाकदुऱ्या काढल्या. परंतु दिल्लीश्वरांनी 'राज्य पातळीवरील नेत्यांशी चर्चा करून हा प्रश्न निकालात काढावा, असे सांगून वाटाण्याच्या अक्षता लावल्या. तर राज्यातील नेते मंडळींनी अखेरच्या क्षणापर्यंत "सांगलीची जागा आमचीच" असा घोषा लावला. परंतु महाआघाडीच्या तिघाड्यात चर्चेत गुंतवून विशाल पाटलांची गेम केल्याची चर्चा सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.
आता विशाल पाटील आपल्या मूळच्या आक्रमक भूमिकेत येऊन, स्व. मदन पाटील यांच्याप्रमाणे अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजयीमाला हातात घेऊन संसदेत पोहोचतात, की काँग्रेस पक्ष नेतृत्वाच्या चक्रव्युहात अडकून राजकीय घात करून घेतात, हे एक-दोन दिवसात स्पष्ट होईल. विशाल पाटील यांनी निवडणूक लढवण्याचे ठरवले तर जिल्ह्यातील नेतेमंडळी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात, की पक्ष कारवाईच्या भीतीने पडद्याआड राहुन मदत करतात, याबाबतही उत्सुकता दिसून येत आहे. मात्र जिल्ह्यातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून विशाल पाटील यांच्यासाठी राजीनामा अस्त्र घेऊन उभे आहेत. आता कोण सरस ठरते, याबाबतचे चित्र दोन दिवसात स्पष्ट होईल.