सांगली समाचार - दि. ११ एप्रिल २०२४
सांगली : सांगलीमध्ये उध्दवसेने प्रतिष्ठा पणाला लावून पैलावन चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली असली तरी सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे गणित बिघडण्याची चिन्ह आहेत. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यासाठी आता बंधू माजी केंद्रीयमंत्री प्रतीक पाटील यांनी बुधवारी सकाळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचीअकोला येथे भेट घेतल्याने काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अपक्ष लढण्याऐवजी वंचितकडून लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी विशाल पाटील गटाकडून चाचपणी चालू आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, प्रतिक पाटील मला भेटून गेले आहेत. त्यामुळे पुढील निर्णय लवकरच घेऊ. सध्या कुठलाही आग्रह केलेला नाही किंवा कुठलीही सल्लाही दिला नसल्याचे आंबेडकर म्हणाले. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. आंबेडकरांच्या अकोल्यातील 'यशवंत भवन' या निवासस्थानी उभय नेत्यांची भेट झाली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी विशाल पाटलांनी उमेदवारी दाखल करावी, असा सल्ला दिला आहे. त्यानंतर निर्णय घेणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. प्रतीक पाटील आंबेडकरांना भेटल्याने मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता आहे.
सांगलीच्या जागेसाठी दिल्लीपर्यंत मजल मारूनही ठाकरेंनाच जागा सुटल्याने सांगली काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे विशाल पाटील बंडाचा झेंडा उभारणार का? याकडे सुद्धा लक्ष आहे. आज सांगलीमध्ये विशाल पाटील समर्थकांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत प्रकाश आंबेडकरांशी झालेल्या चर्चेचा तपशील विशाल पाटील कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहेत. त्यानंतर बंडखोरी की वंचितकडून निवडणूक लढवायची, याबाबत निर्णय होणार आहे.
बैठकीनंतर निर्णय होणार
काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची पलूसमध्ये बुधवारी सायंकाळी बैठक संपन्न झाली. या बैठकीत डॉ. विश्वजीत कदम यांनी काँग्रेस हाय कमांड व उद्धव ठाकरे यांना सांगलीच्या जागे बाबत पुन्हा विचार करावा असे कळकळीचे आवाहन केले. परंतु उध्दव ठाकरे व संजय राऊत यांनी आता कुठल्याही परिस्थितीत माघार नाही शिवसेनेचाच उमेदवार सांगलीत लढणार असे पुन्हा एकदा ठामपणे सांगितले आहे. आता जिल्ह्यातील काँग्रेस नेते व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून आपण पुढील दिशा ठरवू असे डॉ विश्वजीत कदम यांनी यावेळी सांगितले. यानंतर विशाल पाटील निवडणूक लढविण्याबाबतचा निर्णय होणार आहे. अपक्ष की वंचितकडून निवडणूक लढवावी, यावर निर्णय होणार आहे.