Sangli Samachar

The Janshakti News

भाजप मित्रपक्षांना संपवतंय, सर्व्हेच्या नावाखाली फसवतंय; शिंदेंच्या माजी मंत्र्याचा हल्लाबोलसांगली समाचार- दि. २ एप्रिल २०२४
मुंबई - महायुतीत शिवसेना नाराज असून भाजप  मित्रपक्षांना संपवत आहे, अशी टीका माजी मंत्री सुरेश नवले यांनी केली आहे. भाजप सर्व्हेच्या  नावाखाली शिंदेंना फसवतंय, मात्र शिंदे भाजपसमोर झुकणार नाहीत, असं स्पष्ट मत सुरेश नवले यांनी व्यक्त केलं आहे.

शिवसेना मंत्री सुरेश नवले म्हणाले की, "भारतीय जनता पार्टीला जे नको आहेत, ते लोक बदलले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह आहे. त्यासाठी त्यांच्याकडून वारंवार सर्व्हेची कारण दिली जात आहेत. आयव्हीचा रिपोर्ट विरोधात आहे, आम्ही जो रिपोर्ट दिला आहे तो विरोधात आहे, त्यामुळे तुम्ही उमेदवार बदला ही भाजपची रणनिती चुकीची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सौम्य प्रकृतीचे आहेत. परंतु, ते ठाम आहेत, हा विश्वास आम्हाला आहे. भाजपच्या एकूण षडयंत्राला ते बळी पडणार नाहीत. पण, अशा प्रकारचं चित्र भाजपकडून एकंदरीत उभं केलं जात आहे. बाहेर चर्चा सुरू आहेत. आणि ही चर्चा महायुतीसाठी घातक आहे."


महायुतीत शिवसेना नाराज ?

सध्या राज्याच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांच्या महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे. आगामी लोकसभेसाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्र लढणार आहेत. अद्याप महायुतीचा लोकसभेसाठीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाही. अशातच या जागावाटपामुळे शिवसेना नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. भाजपकडून ज्या भागांत शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत, अशा मतदारसंघांवर दावा सांगितला जात असल्याचं दिसत आहे. यावरुन शिंदेंच्या शिवसेनेत कमालीची नाराजी पसरली आहे. भाजपकडून वारंवार सर्व्हेचं कारण देऊन शिवसेनेचं प्रभुत्व असलेल्या मतदारसंघावर दावा सांगितला जात असल्याचं शिवसेनेच्या अनेक आमदार, खासदारांनी जाहीरपणे सांगितलं आहे. तसेच, मनसेला महायुतीत सामील केल्या मनसेला शिंदेंच्याच वाट्याचा मतदारसंघ दिला जाणार असल्याचं बोललं जात होतं. यासर्व कारणांमुळे सध्या महायुतीत धुसफूस सुरू असून शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.