Sangli Samachar

The Janshakti News

पवारांच्या गुगली वर पृथ्वीराज चव्हाणांचा षटकार !सांगली समाचार - दि २ एप्रिल २०२४
सातारा - सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार छत्रपती उदयनराजे यांच्या विरोधात उतरण्यास विद्यमान खासदार श्रीनिवास पाटलांनी नकार दिल्यानंतर शरद पवारांकडे तेवढा "तगडा" उमेदवार उरला नाही. त्यामुळे शरद पवारांनी साताऱ्याची उमेदवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला. पण पवारांनी टाकलेल्या या राजकीय गुगली वर पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार षटकार हाणला. कारण पवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती त्या उलट पृथ्वीराज चव्हाण यांनी तुमच्या तुतारी चिन्हावर नव्हे तर काँग्रेसच्या हाताच्या पंजाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगून सातारा लोकसभा मतदारसंघ कायमचा काँग्रेसकडे खेचण्याचा प्रतिडाव खेळला.

त्यामुळे आता चेंडू पवारांच्या कोर्टात गेला असून पवारांची आता पंचाईत झाली आहे. एक तर पवारांकडे साताऱ्यासाठी "तगडा" उमेदवार नाही. शशिकांत शिंदे किंवा सुनील माने यांना उभे करून ते छत्रपती उदयन महाराज यांना "तगडी" टक्कर देण्याची शक्यता नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर सातारा लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करण्याची वेळ येणार हे लक्षात घेऊन पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांना गुगली टाकली. त्यांच्याकडे जयंत पाटलांना पाठवून त्यांना तुतारी चिन्हावर निवडणुकीत उतरण्याची ऑफर दिली. पृथ्वीराज चव्हाण यांनी सुरुवातीला या ऑफरवर होकार भरला पण पवारांनी आपल्यावर गुगली टाकल्याचे लक्षात येतात त्या गुगली वर त्यांनी षटकार देखील ठोकला.


पृथ्वीराज चव्हाण यांनी पवारांच्या राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढण्याचे नाकारले. त्या उलट आपण हाताचा पंजा याच चिन्हावर निवडणूक लढवू अंतिम निर्णय पवारांनी घ्यावा, असे सांगून ते मोकळे झाले. कारण सातारा मतदारसंघ सध्यातरी पवारांच्या राष्ट्रवादीकडे असल्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांनी थोडा संयम दाखविला, पण या संयमात देखील त्यांनी अचूक खेळी केली. पवारांकडे "तगडा" उमेदवार नाही हे पाहून सातारा लोकसभा मतदारसंघ कायमचा काँग्रेसकडे खेचून घेण्याची ही खेळी ठरली. आता पवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रति ऑफरवर काय उत्तर देतात की आपल्या पक्षाच्या हातातून सातारा मतदारसंघ जाऊ नये म्हणून तिथे हरलो तरी बेहत्तर पण आपलाच उमेदवार देणार!!, अशी भूमिका घेतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.