Sangli Samachar

The Janshakti News

विशाल पाटलांच्यावर कारवाईची टांगती तलवार ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.२३ एप्रिल २०२४
विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी काँग्रेसने विशाल पाटलांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मविआ नेत्यांनीदेखील त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. दरम्यान, पक्षाविरोधी भूमिका घेतल्यामुळे काँग्रेस पक्ष विशाल पाटलांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना विशाल पाटलांना कारवाईचा इशारा दिला आहे.

नाना पटोले म्हणाले, धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. लोकांनीदेखील तसा निर्णय घेतला आहे. मतांचं विभाजन होऊ देणार नाही असं लोकांनीच ठरवलं आहे. त्याचे चांगले परिणाम तुम्हाला आगामी काळात दिसतील.

विशाल पाटलांच्या उमेदवारीबाबत नाना पटोले म्हणाले, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. आम्ही त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी माघार घेतलेली नाही. त्यांना कोणीतरी फूस लावतंय असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. येत्या २५ एप्रिल रोजी आमची सांगलीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबर बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील निर्णय घेतले जातील.

दरम्यान या कारवाईचा अथवा इशाऱ्याचा विशाल पाटील यांच्यावर मात्र कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे साहित्य दिले असून प्रचाराला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता आगामी काळात नेते महाआघाडी सोबत तर कार्यकर्ते  विशाल पाटलांसोबत असे चित्र पहावयास मिळाले तर आश्चर्य वाटायला नको.