| सांगली समाचार वृत्त |
जत - दि.२८ एप्रिल २०२४
लोकसभा निवडणुकीसाठीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराने आता चांगलीच गती घेतली असून सर्वच उमेदवार एकमेकांवर जोरकस टीका करताना दिसत आहेत. सत्ताधारी मंडळींकडून आपण केलेल्या कामाची यादी मतदारांसमोर सम वाचून दाखवल्या जात असून, विरोधक सत्ताधारी पक्ष कामात, कर्तव्यात कसा चुकला याचा पाढा वाचून दाखवत आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघ ही याला अपवाद नाही. भाजपचे सांगली लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनी प्रचारात चांगली आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. गेल्या दहा वर्षात आपण केलेल्या कामाची यादी ते मतदारांसमोर सादर करीत आहेत, पण त्याचवेळी काही कामे पूर्ण राहिली असून, आगामी पाच वर्षात ही कामे पूर्ण करण्याचे वचन ते मतदारांना देत आहेत. "मला मत म्हणजे मोदींना मत !" हे सांगण्यासही खा. संजय काका चुकत नाहीत.
खा. संजय काका पाटील यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी विशाल पाटील हे संजय काका पाटील कसे निष्क्रिय खासदार आहेत, त्यांनी गेल्या दहा वर्षात कोणतेच विकास काम पूर्ण केले नाही, उलट काँग्रेसच्या कार्यकाळात जाहीर झालेल्या योजनांचे नारळ ते फोडत आहेत असा आरोप केला आहे.
तर हॅट्रिकच्या तयारीत असलेल्या खा. संजय काका पाटील यांनी विरोधकांनी 35 वर्षात जितके काम केले नाही तितके काम आपण गेल्या दहा वर्षात केल्याचे ठासून सांगितले आहे. आरोप प्रत्यारोपाची ही जुगलबंदी मतदारांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
दरम्यान यंदा संजय काका हॅट्रिक करणार की विशाल पाटील बाजी मारणार ही चर्चा रंगली असतानाच, मतदारांनी भाकरी परतवण्याचे ठरवले असून यावेळी विशाल पाटीलच सन्मानाने संसदेत जातील असे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. तर, खा. संजय काका पाटील यांचे कार्यकर्ते यंदा हॅट्रिक होणारच असा नारा देताना दिसत आहेत.