Sangli Samachar

The Janshakti News

विशाल पाटील यांचे बंड शांत होणार की 'जोर का झटका धीरे से देणार ?'



| सांगली समाचार वृत्त |
सांगली, दि.१४ एप्रिल २०२४ - पाच सहा महिन्यापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सत्कार समारंभात बोलताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगलीतून काँग्रेस तर्फे विशाल पाटील हेच लोकसभेची निवडणूक लढवतील, असे जाहीर केले. इथपासून ते अगदी गुढीपाडव्यादिवशी महाआघाडीच्या पत्रकार बैठकीत सांगलीच्या जागेसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या मागणीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर, पलूस येथे डॉ. विश्वजीत कदम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेपर्यंत काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील हे स्वतः कुठेच पुढे आले नाहीत. उलट 'डॉ. विश्वजीत कदम हेच आमचे नेते असून सर्व निर्णय तेच घेतील.' असे सांगून विशाल पाटील यांनी दुय्यम भूमिका स्वीकारली. अपवाद फक्त शिवसेनेचे संजय राऊत यांनी गलिच्छ भाषेत डॉ. विश्वजीत कदम यांच्यावर आरोप केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त करण्याचा.

किंबहुना विशाल पाटील यांची कुटनीतीने उमेदवारी कापल्यानंतर कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला. आपली नाराजी जाहीररित्या व्यक्त केली. याचाच एक भाग म्हणजे जतच्या कार्यकर्त्यानी रक्ताने लिहिलेले पत्र असो, तेव्हा तत्पूर्वी काँग्रेस कमिटीवरील काँग्रेस या शब्दावर पांढरा रंग फासणे असो. किंवा मग मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करणे असो. या साऱ्या घटनाक्रमामध्येही विशाल पाटील अत्यंत शांतच होते.


परंतु काल अचानक विशाल पाटील हे काँग्रेस कमिटी जवळ उपस्थित झाले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणलेला 'सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी' हा डिजिटल फलक पुन्हा काँग्रेस कमिटीच्या भिंतीवर लावण्यात स्वतः पुढाकार घेतल्याचे फोटो व व्हिडिओ विविध प्रसार माध्यमातून, कार्यकर्त्यांना व मतदारांना दिसून आले. उलट विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन करताना, कार्यकर्त्यांनी आपला राग काँग्रेस पक्षावर व्यक्त करू नये. वसंतदादांपासून अनेकांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून सांगलीत काँग्रेस रुजवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यासाठी रक्त सांडले आहे. त्यामुळे असे कुठलीही कृती करू नका ज्यामुळे त्यांचा अवमान होईल. राग व्यक्त करायचाच असेल तो आमच्यावर करावा, कारण उमेदवारी मागण्यात आम्हीच कुठेतरी कमी पडलो असावे, असे जाहीररित्या सांगितले. विशाल पाटील यांनी ज्या प्रकारे आतापर्यंत भूमिका घेतलेली आहे, त्यावरून त्यांचे बंड शांत होणार का ? ते महाआघाडीच्या पै. चंद्रहार पाटील यांना पाठिंबा देणार का ? की मग थम्सअपच्या जाहिरातीप्रमाणे 'जोरका झटका धीरे से' देणार ? असा प्रश्न, समाज माध्यमातून व विविध इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियामधून विचारला जात आहे.

विशाल पाटील यांना कुठेतरी ठाऊक होते का ? 'की आपल्याला चक्रव्युहात अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे.' आणि मग आता त्यांची भूमिका काय असणार ? हा ही प्रश्न कार्यकर्ता व मतदारांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. 

परंतु याचवेळी दुसऱ्या बाजूला विशाल पाटील यांनी तितक्याच शांतपणे आपला प्रयत्न व प्रचार सुरू ठेवला आहे. विविध संघटना, धार्मिक नेते, भाजपामधील नाराज नेते, राष्ट्रवादीचा अजित पाटील गट, मतदार यांच्या भेटीगाठी सुरू ठेवल्या आहेत. त्यांचे बंधू माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना भेटून त्यांचा पाठिंबा मिळवलेला आहे. यावरून रणांगणातून उलट न काढता, 'आलात तर तुमच्या बरोबर अन्यथा तुमच्याशिवाय !' हाच संदेश आपल्या कृतीतून विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिला असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.