Sangli Samachar

The Janshakti News

भाजपच्या जाहीरनाम्यातून "मोदींची गॅरंटी"




| सांगली समाचार वृत्त |

नवी दिल्ली - दि.१४ एप्रिल २०२४ - 
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज राजधानी दिल्लीत आपला जाहीरनामा प्रसिद्ध केल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने दिल्लीतील मुख्यालयात नुकतेच जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. यावेळी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या जाहीरनाम्याची पहिली प्रत सरकारी योजनेच्या एका लाभार्थ्याला देण्यात आली. त्यानंतर इतर काही लाभार्थ्यांनाही भाजपच्या जाहीरनाम्याच्या प्रती देण्यात आल्या.

भाजपच्या संकल्प पत्राच्या प्रकाशनापूर्वी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, 2014 मध्ये, जेव्हा पंतप्रधान मोदी संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवडले गेले तेव्हा ते म्हणाले, 'आमचे सरकार गरीब, खेडे आणि समाजाच्या तळा-गाळातील लोकांसाठी समर्पित आहे'. ते त्यांनी प्रत्यक्षात आणून, गेल्या 10 वर्षांत पंतप्रधान मोदींनी त्यांच्या नेतृत्वाखाली देशाला पुढे नेण्याचे काम केले आहे."


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा पुढे म्हणाले, "तुम्ही आम्हाला स्पष्ट जनादेश दिला त्यामुळे स्पष्ट निकाल आले. तुम्ही स्पष्ट जनादेश दिला आणि कलम 370 रद्द करण्यात आले."

राममंदिराबाबत बोलताना ते म्हणाले, "आम्ही ते दिवस पाहिले जेव्हा काँग्रेसचे वकील उभे राहून न्यायालयीन प्रक्रिया थांबवण्याचा प्रयत्न करायचे आणि म्हणायचे की त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होईल. त्यांना देशाची चिंता नव्हती त्यांना रामलल्लाची चिंता नव्हती. त्यांनी फक्त व्होट बँकेचे राजकारण करत अडथळे निर्माण केले. पण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भव्य राम मंदिर बांधले गेले.'

यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, २०१४ च्या निवडणुका आम्ही मोदीजींच्या नेतृत्वाखाली लढवणार होतो, त्यावेळी मी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होतो आणि डॉ. मुरली मनोहर जोशी जाहीरनामा समितीचे अध्यक्ष होते. मोदीजींची विनंती लक्षात घेऊन पक्षाचे ठराव पत्र तयार करण्यात आले, ज्यामध्ये आम्ही देशाला जी काही अश्वासने दिली, ती निश्चितपणे पूर्ण केली.


यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. अशा शुभ मुहूर्तावर आज भाजपने विकसित भारताचा जाहीरनामा देशासमोर ठेवला आहे. मी तुम्हा सर्वांचे, सर्व देशवासियांचे खूप खूप अभिनंदन करतो.

ते पुढे म्हणाले, दरम्यान भाजपचे हे संकल्प पत्र, चार स्तंभांवर आधारित आहे. ज्यामध्ये युवाशक्ति, नारीशक्ति, गरीब आणि शेतकऱ्यांना सशक्त करण्याचा प्रयत्न होणार आहे. यामध्ये लोकांच्या जीवनाचा दर्जा, जीवनमान आणि गुंतवणुकीतून नोकऱ्या निर्माण करण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे.