Sangli Samachar

The Janshakti News

कंगना राणावत, राहुल गांधी, नितीन गडकरींना किती मते मिळणार ?; भविष्य सांगा अन् २१ लाख जिंका !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२४ एप्रिल २०२४
कंगना राणावत, राहुल गांधी, नितीन गडकरी यांना किती मते मिळतील? याचे अचूक भविष्य सांगा आणि २१ लाख रूपये जिंका असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिले आहे. अंनिसने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, देशभरात अनेक ज्योतिषी निकालांचे भाकीत वर्तवत असतात.

राजकीय नेते त्यांच्या फसवणुकीला बळी पडतात. यातून अंधश्रद्धेला खतपाणी मिळते. या पार्श्वभूमीवर अंनिसने ही आव्हान प्रक्रिया राबविली आहे. डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, सम्राट हटकर, रामभाऊ डोंगरे, मिलिंद देशमुख, प्रकाश घादगिने, विनोद वायगणकर, प्रवीण देशमुख यांनी सांगितले की, लोकप्रबोधनाच्या हेतूने ही आव्हान प्रक्रिया राबविली जात आहे. उमेदवाराची जन्मकुंडली, हस्तरेषा शास्त्र, अंकशास्त्र, टॅरो कार्ड, राशीभविष्य, नाडी भविष्य, होरा शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धत, प्राणी पक्षी यांच्या वापराने वर्तविलेले भविष्य किंवा अर्ज भरताना काढलेला मुहूर्त, प्रचाराचा काढलेला मुहूर्त, उमेदवाराच्या नावातील अद्याक्षरे यापैकी कशाच्या आधारे भविष्य वर्तविले हे ज्योतिषाने स्पष्ट करायचे आहे.


आव्हान प्रक्रियेत सहभागासाठी प्रवेशिका, उत्तरासहित प्रश्नावली आणि 'अंधश्रध्दा निर्मूलन समिती, महाराष्ट्र' या नावे काढलेला ५००० रुपयांचा धनाकर्ष (डीडी) २५ पर्यंत कार्तिक अपार्टमेंट, एफ ४, सहारा चौक, संजयनगर, सांगली या पत्त्यावर पाठवायचा आहे. लोकसभेचे सर्व निकाल निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर झाल्यावर दोन आठवड्यांत परीक्षक समिती ज्योतिषाचा निकाल जाहीर कोल.

अंनिसची प्रश्नावली

आव्हान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या ज्योतिषांना अंनिसने दिलेली प्रश्नावली अशी : 

• टी. शैलजा, नितीन गडकरी, राहुल गांधी, महुआ मलहोत्रा, कंगना राणावत यांना किती मते पडतील ? 

• कोलकत्ता उत्तर, नालंदा, रायपूर, बारामती, आग्रा, बेल्लारी येथे कोण विजयी होईल ? 

• वाराणसी, बुलढाणा, चांदणी चौक, लडाख, वेल्लोर, भुवनेश्वर येथे सगळ्यात कमी मते कोणाला पडतील ? 

• संपूर्ण भारतात सर्वात कमी मते कोणाला मिळतील ? 

• कोणत्या मतदारसंघात नोटाला जास्त मतदान होईल ? 

• पाच हजारांपेक्षा कमी मताधिक्य किती उमेदवारांना मिळेल ?

• आता अंनिसच्या या आवाहनाला किती भविष्यवेत्ते प्रतिसाद देतात, आणि या आव्हानाला प्रतिसाद देऊन सांगितले गेलेल्या भविष्यापैकी कितीजणांचे भविष्य तंतोतंत खरे ठरते ? हे 4 जून नंतरच समजू शकेल.