| सांगली समाचार वृत्त |
सांगली, दि.१४ एप्रिल २०२४ - सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटील यांना मिळावी या करीता आम्हा सर्वांची भावना आजही आहे. महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयाचा धक्का आम्हा सर्वांनाच बसलेला आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा आणि काँग्रेसची उमेदवार विशाल पाटील यांना द्यावी असा प्रस्ताव आमचे नेते आमदार विश्वजीत कदम यांनी वरिष्ठांना दिला आहे. सांगलीची हक्काची जागा काँग्रेस कडेच राहावी या साठी आम्ही सर्वच जिल्हातील नेत्यांनी प्रयत्नाची परकष्टा केली आजही आम्ही प्रयत्न सोडले नाहीत अशा परिस्थितीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. आपल्या मनात कितीही संतापाची भावना असली तरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बोर्डावरील काँग्रेस या शब्दाला रंग फासण्याची कृती कदापी समर्थन करण्यासारखी नाही. गेल्या 75 वर्षात काँग्रेसच्या अनेक विजयाची ही इमारत साक्षीदार आहे. काँग्रेस हा शब्द तिथे सन्मानाने मिरवत आला आहे. तो केवळ एका शब्दाचा नव्हे तर संपूर्ण काँग्रेसही विचाराचा अपमान ठरेल. त्यामुळे कोणतीही कृती करताना कार्यकर्त्यांनी संयम ढळू देऊ नये.
काँग्रेस हा विचार आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटलेली ही संघटना आहे. काँग्रेस ही आपली ताकद आहे. परिस्थिती कितीही विपरीत आली तरी त्या विचाराने, त्या शक्तीला सोबत घेऊन आपणाला लढायचे आहे. आपणास काँग्रेस हा शब्द नव्हे तर या जिल्ह्यातून जातीयवादी भाजप हा शब्द संपवून टाकायचा आहे. भाजपच्या पराभवासाठी महाविकास आघाडी एकत्र आली आहे. देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडी एकजुटीने लढत आहे. अशावेळी आपल्या सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की आपण इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला ताकद दिली पाहिजे. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा या देशातून जातीयवादी शक्तीचे उच्चाटन करण्यासाठी बांधील असला पाहिजे. आपल्या लढाईची दिशा निश्चित आहे. त्या लढाईपासून भरकटून चालणार नाही. त्यामुळे सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी समोर जे काही घडले त्याचे नक्कीच समर्थन करता येणार नाही. असे प्रतिपादन सांगली ग्रामीण जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आ. विक्रम सावंत व सांगली शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.