Sangli Samachar

The Janshakti News

राहुल गांधींची मोठी घोषणा; महिलांच्या खात्यात महिन्याला जमा करणार 8500 रुपये



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली, दि.१४ एप्रिल २०२४ - गेल्या १० वर्षात नरेंद्र मोदींनी उद्योगपतींसाठी सरकार चालवलं. सामान्य जनतेच्या हाताला मात्र काहीही लागलं नाही. भाजपवाले आणि नरेंद्र मोदी कधीही महागाईवर बोलत नाहीत. कधी शेकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. शेतीमालाला भाव नाही. तरुणांना रोजगार नाही, अशी परिस्थिती सध्या देशात असल्याचं म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मोदी सरकारने जितकं या मोजक्या उद्योगपतींना दिलं आहे. त्यापेक्षा कतीतरी पटीने काँग्रेसचं सरकार आल्यानंतर देशातील सामान्य जनतेला देणार आहे. तर महिलांच्या खात्यात दर महिन्याला ८५०० रुपये जमा करणार असल्याची मोठी घोषणा राहुल गांधी यांनी केली.

देशातल्या महिला घर चालवण्यासाठी घरी आणि घराच्या बाहेरही काम करतात, मग त्यांना दुप्पट मानधन, पगार, पैसे का मिळत नाही? घराच्या बाहेर काम करणाऱ्या महिलांना कामाचा मोबदला मिळतो, मात्र घरी केल्या जाणाऱ्या कामाचा मोबदला मिळत नाही. काँग्रेसने महिलांच्या घरातील कामाचा विचार केला आहे. , देशाचं भविष्य सांभाळणाऱ्या या महिलांच्या खात्यात वर्षाला १ लाख रुपये, म्हणजेच महिन्याला ८५०० रुपये जमा केले जाणार आहेत, काँग्रेसच सरकार आल्यांनतर लगेचच याची अंमलबजावणी केली जाईल, असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं. यासाठी देशातील गरीब महिलांचा सर्व्हे केला जाईल आणि यातून समोर आलेल्या गरीब कुटुंबातील एका महिलेला याचा लाभ मिळेल. दर महिन्याच्या १ तारखेला हे पैसे जमा होतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.


नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये देशातल्या तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आज अशी स्थिती आहे की लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमाला हमीभाव दिला नाही. देशातील शेतकरी अडचणीत असताना कर्जमाफी होत नाही. काँग्रेसचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारत जोडो यात्रा काढली. शेतकरी, मजुरांसह अनेकांची भेट घेतील. त्यांच्याशी संवाद साधला, विचारलं सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे, ते म्हणाले, बेरोजगारी, महागाई, शेतमालाला भाव. मात्र तुम्ही टीव्ही पाहिला तर तुम्हाला बेरोजगारी, महागाई हे मुद्दे दिसणार नाही. तुम्हाला तिथे फक्त बॉलीवूड स्टार, क्रिकेटर आणि पंतप्रधान मोदी दिसतील, असा टोला त्यांनी लगावला.