Sangli Samachar

The Janshakti News

जयंत पाटलांच्या खांद्यावर बंदुक ठेवून फडणवीसांनी केली दादा घराण्याची शिकार?| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.१९ एप्रिल २०२४
सांगली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. सांगलीचे तीन पाटील एकमेकांविरोधात दंड थोपटत आहेत. यासाठी कारणीभूत धरलं जातंय ते चौथ्या पाटलांना, त्यांचं नाव जयंत पाटील. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष. महायुतीने विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना कमळावर हॅट्रिक करण्याची संधी दिली. दुसरे आहेत चंद्रहार पाटील ते महाविकास आघाडीकडून मशाल घेवून रिंगणात उतरले आहेत. तर वसंत दादांचे नातू, कॉंग्रेसचे नेते विशाल पाटील अपक्ष लढत देण्याच्या तयारीत आहेत. महाविकास आघाडीचेच दोन उमेदवार रिंगणात आहेत. या तिरंगी लढतीसाठी जबाबदार धरलं जातंय जयंत पाटील यांना. दादा आणि बापू घराण्याचा वाद सांगलीत सर्वश्रुत आहे. दादा घराण्याची कारकीर्द थांबवण्यासाठी जयंत पाटलांनी गेम केल्याचं बोललं गेलं. मात्र, फडणवीसांची पडद्याआड असलेली भूमिका भाजपचा विजय निश्चित करणारी माणली जाते.

तिरंगी लढत

महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन मोठा वाद रंगला होता. गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर मविआचं जागा वाटपावर एकमत झालं. अगदी त्या क्षणापर्यंत सांगलीच्या जागेवरुन वाद होता. कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला सांगली कॉंग्रेसला हवा होता. तर गेल्या दोन लोकसभा निवडणूकीती पराभवाकडे ठाकरे गट बोट दाखवत होता. ठाकरेंनी आपला उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटलांची घोषणा केली, ती सर्वांची नजर वळाली जयंत पाटलांकडे. दादा घराण्याच्या राजकारणाला पूर्णविराम लावण्यासाठी जयंत पाटलांनी ही खेळी केल्याचं बोललं गेलं. आता या सर्व घटनाक्रमात फडणवीसांचं नाव घेतलं जातंय.

दादा- बापू वादाचा इतिहास

सांगली जिल्ह्याचं राजकारणाचा जाणकार असलेला प्रत्येक जण दादा- बापू वादाबद्दल जाणून आहे. कॉंग्रेसच्या सुरुवातीच्या काळात 60 च्या दशकात वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील यांचा राजकीय उदय झाला. एकाच जिल्ह्यातील या दोन बड्या नेत्यांमध्ये बराच काळ संघर्ष राहिला. वसंतदादांनी राजाराम बापुंचे पंख छाटण्याची एकही संधी सोडली नव्हती. एकीकडे वसंत पाटील मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचले. दुसरीकडे राजाराम बापुंना जनता पक्षात जावं लागलं. अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला. वसंत दादांचे नातू हे विशाल पाटील आहेत तर राजाराम बापू पाटलांचे चिरंजीव आहेत जयंत पाटील. जयंत पाटलांनी राजकारणात सक्रिय झाल्यापासून सांगलीवर एकहाती पकड ठेवलीये. हळुहळु दादा घराण्याला कॉर्नर केलं. मविआकडून ही जागा ठाकरेंना सुटावी, त्याचे उमेदवार चंद्रहार पाटील असावेत, ही तरतुद जयंत पाटलांनी केल्याचा आरोप होतो. यामुळे कॉंग्रेसला जागा सुटली नाही. विशाल पाटलांच्या उमेदवारीवर तलवार कोसळली.

विशाल पाटलांचं शक्तीप्रदर्शन

विशाल पाटलांनी 17 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल केला. एक अपक्ष आणि दुसरा कॉंग्रेस पक्षाकडून. यावेळी मोठा जनसमुदाय लोटला आहे. विशाल पाटलांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. सांगलीतील जनतेचा मोठा पाठिंबा त्यांना आहे. तरी मविआत त्यांना जागा का मिळाली नाही? हा प्रश्न विचारला जातो आहे. जयंत पाटील यांचं दादा घराण्यासोबत असेललं राजकीय वैर यासाठी कारणीभूत असल्याचं बोललं जातंय. दादा बापु वादामध्ये राजाराम बापुंचा विधानसभा निवडणूकीत पराभव झाला होता. ते वर्ष होतं 1978 . वाळवा विधानसभेतून बापु उभे होते. वसंतदादांनी पुर्ण ताकद लावून बापुंचा पराभव केला. यानंतर राजाराम बापुंचं महत्त्व राजकारणात कमी झालं. त्यांना कोपऱ्यात ढकललं गेलं. थोडक्यात त्यांच्या राजकीय कारकिर्दिला पुर्ण विराम लागण्यास इथून सुरुवात झाली होती. हा पराभव बापूंच्य जिव्हारी लागला. 1984 ला त्यांचं निधन झालं. जयंत पाटील राजकारणात ॲक्टिव्ह झाले.

फडणवीसांची भूमिका

महाविकास आघाडीतील झारीतले शुक्राचार्य कोण ? हा प्रश्न वरचेवर विचारला जातो आहे. महाविकास आघाडीत राहुन महायुतीचे काम करणारे नेते समोर आले पाहिजेत, अशी टीका ही होते आहे. अनेकांनी अशा सुरात अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांवर टीका होत होती. जयंत पाटील व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमधील दोस्ती अनेकदा अधोरेखित झाली आहे. जयंत पाटलांना महायुतीत घेण्यासाठी फडणवीसांनी पुर्ण प्रयत्न केल्याच्या बातम्याही येत होत्या. अजित दादांमुळं हे शक्य झालं नसल्याचंही बोललं गेलं. मात्र जयंत पाटलांसोबतच्या याच दोस्तीचा फायदा फडणवीसांनी करुन घेतल्याचं बोललं जातंय. भाजपने यंदा ४०० पार जाण्याचा नारा दिला आहे. सांगलीची जागा भाजपला जड जाणार असल्याची चर्चा होती. मात्र चंद्रहार पाटलांसारखा नवखा उमदेवार, विशाल पाटलांचं कापलेलं तिकीट,दोघांमध्ये लढत होवू होणारी मतविभागणी भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. जयंत पाटलांच्या साथीनं फडणवीसांनी सांगलीचा हातून निसटलेला गड राखल्याचं बोललं जातंय.