Sangli Samachar

The Janshakti News

"लढायचे की तलवार म्यान करायची ?" या द्विधा मनस्थितीत असलेल्या विशालदादांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२२ एप्रिल २०२४
वसंतराव दादा पाटील 'बस नाम ही काफी हैं |' असं नेतृत्व. वसंतदादांनी 24 जुलै 1943 रोजी सांगलीचा जेल फोडून इंग्रजांना  पळताभुई थोडी केली होती. स्वातंत्र्यासाठी दादांनी दिलेले योगदान खरोखरच आकाशाच्या उंचीचे आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्याचे सुराज्य करण्यासाठी दादांनी सहकाराची जोड घेऊन उभे केलेले काम हिमालयाच्या उंचीचे म्हणावे लागेल. संपूर्ण हयातीत दादा कधीही कुणासमोर झुकले नाहीत. आणि म्हणूनच सांगली जिल्ह्याचेच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे नेतृत्व दादांकडे आलेले होते. दादा म्हणतील तोच उमेदवार काँग्रेसला द्यावा लागलेला होता. सांगली तर काँग्रेसचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्याची वीट आणि वीट रचण्यासाठी दादांनी दिवसाची रात्र आणि रक्ताचे पाणी केले होते.

आज त्याच वसंतदादांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसच्या चिन्हाशिवाय निवडणूक होत आहे. त्याचवेळी याच वसंतदादांच्या नातवाला, उमेदवारीसाठी झुलवत ठेवून शेवटी 'हातावर' तुरी दिली. परिणामी विशालदादांनी बंडखोरी करावी आणि दादांनी ज्याप्रमाणे इंग्रजांचा तुरुंग फोडला, त्याचप्रमाणे लोकसभेचे दार फोडून स्वाभिमानाने संसदेत दाखल व्हावे, असा आग्रह काँग्रेसप्रेमी व विशालदादांच्या कार्यकर्त्यांनी धरलेला आहे. आज संपूर्ण जिल्ह्यात विशाल दादांच्या बाजूने जनमत दिसून येत आहे.

वास्तविक याचीच दखल घेऊन ठाकरे व काँग्रेस नेत्यांनी विशालदादांना संधी द्यायला हवी होती. परंतु उलट विशालदादांवर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणला जातो आहे. अर्थात अजून तरी विशालदादांनी या दबावाला भीक घातलेली नाही. मतदारांची, कार्यकर्त्यांची प्रचंड सहानभूती आणि जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांचा उघड नसला तरी छुपा पाठिंबा विशाल दादांना असल्याचे दिसून येत आहे.

अर्थात ज्या वसंतदादा घराण्यांने काँग्रेसला मोठे केले आणि ज्या काँग्रेसने वसंतदादा घराण्याला मोठे केले, हे समीकरण मोडणे विशाल दादांना अवघड जात आहे. एकीकडे गनिमी काव्याने प्रचार सुरू असतानाच, "लढायचे की तलवार म्यान करायची ?" या द्विधा मनःस्थितीत असलेले विशालदादा पाटील काय निर्णय घेतात, हे आज दुपारी तीन वाजेपर्यंत समजेल. तत्पूर्वी जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेत्यांची गुप्त बैठक होणार असून, पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे.