Sangli Samachar

The Janshakti News

उद्धव ठाकरेंचा राऊतांवर कंट्रोल राहिला नाही !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.२२ एप्रिल २०२४
शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते, खासदार संजय राऊत दररोज सत्ताधारी पक्षातील नेत्यांना आपल्या धारधार शब्दांनी घायाळ करतात. त्यांच्या काही विधानांनी वादही ओढावलेले आहेत. मात्र त्यांनी मात्र कधीही आपले शब्द मागे घेतले नाहीत. यावरून शिवसेना शिंदे गटाने राऊतांच्या खांद्यावर बंदूक ठेवून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. राऊतांना काहीतरी गुपिते माहिती आहेत, त्यामुळेच त्यांच्यावर ठाकरेंचा कंट्रोल राहिला नाही, असा खळबळजनक आरोप नगरचे जिल्हाध्यक्ष राजू वाघमारेंनी केला आहे.

राजू वाघमारे म्हणाले, संजय राऊत यांच्यावर उद्धव ठाकरे यांचा कंट्रोल राहिलेला नाही. राऊत यांना शिवसेनेची काही रहस्य माहीत असावेत. संजय राऊत यांच्या वागण्यामुळे शिवसेना फुटली आहे. उध्दव ठाकरे त्यांना रोखू शकत नाही, असे शिवसेनेचे काय रहस्य आहे जे संजय राऊतांना माहिती आहे ?, असे म्हणत वाघमारेंनी ठाकरेंवर निशाणा साधला.


मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंनी युती तोडली, आता त्यांना पंतप्रधान व्हायचे आहे, असा आरोप भाजपकडून वारंवार केला जातो. यावर वाघमारे म्हणाले, उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अशी स्थिती संजय राऊत आणि ठाकरे शिवसेनेची आहे. त्यांना मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर पंतप्रधान पदाची लालसा उत्पन्न झाली. ते शरद पवारांना सांगतायत की तुम्ही पंतप्रधान होऊ नका, तुम्ही रिटायर्ड झालात. मात्र आता आलेल्या सर्व सर्व्हेमध्ये महाविकास आघाडी पिछाडीवर आहे. त्यामुळे माध्यमांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी अशी विधाने केली जात असल्याचा आरोपही वाघमारेंनी केला.

वाघमारेंनी काँग्रेस आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरांतावरही सडकून टीका केली. ते म्हणाले 2019 ला शिर्डीसाठी काँग्रेसकडून इच्छुक होतो. स्थानिक असल्याने सर्व्हेत माझे नाव पुढे होते. मात्र बाळासाहेब थोरातांनी ते तिकीट भाऊसाहेब कांबळे यांना दिले. असे करून थोरातांनी काँग्रेसची शिर्डी जागेची तिकीट ठाकरे गटाला गिफ्ट करून टाकली. त्यांनी विश्वासघात केला आहे. काँग्रेस पक्ष बौद्ध समाजाशी जसा वागतोय त्यामुळे काँग्रेसला मतदान करू नका. जी काँग्रेस आपल्या समाजाला मानत नाही त्या काँग्रेसला मत देण्यात काही अर्थ नाही, असेही वाघमारे म्हणाले.