पुणे - आतापर्यंत आपण देवाचे करणे नारळात पाणी असं म्हणत होतो परंतु आता देवाची करणे झाडाच्या खोडात पाणी असं म्हणण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. एखाद्या झाडावर कुऱ्हाड मारावी आणि त्यातून पाण्याचा फवारा बाहेर पडावा यावर सामान्य माणूस तरी विश्वास ठेवू शकत नाही. कारण झाडामध्ये पाणी असते आणि तेही एवढ्या प्रमाणात असते की ते चक्क एवढ्या दाबाने बाहेर येईल हे आपण कधी पाहिलेलंच नाही. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एका झाडातून पाण्याच्या फवारा उडताना दिसत आहे. हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. सदर व्हिडिओ आंध्र प्रदेशातील असून येथील वन विभागातील काही कर्मचाऱ्यांनी इंडियन लॉरेल वृक्षाच्या खोडावरील काही भाग तोडल्यानंतर त्यात साठलेले पाणी बाहेर पडल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. पाण्याचा दाब आणि खोडामध्ये साठलेले पाणी पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.
अधिक माहितीनुसार, इंडियन लॉरेल हा वृक्ष आपल्या खोडात पाणी साठवतो. हे झाड आंध्रप्रदेशातील गोदावरी परिसरातील पापीकोंडा राष्ट्रीय अभयारण्यात आढळून आल्याची माहिती आहे. त्याचबरोबर 'इंडियन लॉरेल ट्री'ला टर्मिनलिया टोमेंटोसा असं देखील संबोधलं जातं. उन्हाळ्यात पाणी साठवण्यासाठी हे झाड ओळखले जाते आणि 2020 मध्ये केरळच्या मुख्य वन्यजीव वॉर्डनने याचा शोध लावला तेव्हा त्याची प्रथम नोंद झाली असं सांगण्यात येत आहे.