Sangli Samachar

The Janshakti News

निवडणूक आचारसंहिता भंग आणि कारवाईची धास्तीने अधिकारी-कर्मचाऱ्यांनी व्हॉट्सऍप ग्रुप सोडले !


सांगली समाचार - दि. १ एप्रिल २०२४

मुंबई  - निवडणूक काळामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्याशी संबंधित व्हॉट्सअॅप चॅटिंग किंवा स्टेटस किंवा प्रचारावर निवडणूक आयोगाने वॉच ठेवण्याचे धोरण कडक केले आहे. निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नांदेड जिल्हा परिषदेच्या एका कर्मचाऱ्याला थेट निलंबित करण्यात आल्याने सरकारी अधिकारी आणि कर्मचारी हादरले आहेत. अनेकांनी राजकीय नेते, आमदार, खासदारांच्या कार्यकर्त्यांचे ग्रुप सोडले. स्टेटस ठेवणे बंद केले.


सरकारी नोकरीत असले तरी बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी यांना राजकारणाची मोठी गोडी आहे. अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे काही विशिष्ट नेते, आमदार, खासदार यांचे खास म्हणून वावरत असतात. राजकारणावर चर्चा करतात किंबहुना सोशल मीडियावरदेखील व्यक्त होतात. अनेक कर्मचारी, शिक्षक यांनी तर थेट प्रचार सभांमध्ये भाषणे ठोकून उमेदवाराचा प्रचार केल्याची उदाहरणे आहेत. काही जण तर उमेदवार आणि राजकीय पक्षाच्या कार्यालयात बसून निवडणुकीचे प्रत्यक्ष कामदेखील करत असल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले आले होते.

वॉट्सॲपद्वारे निवडणुकीच्या प्रचाराबाबतचा संदेश देऊन या कर्मचाऱ्याने आचारसंहितेच्या नियमाचे उल्लंघन केल्याने नांदेड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 मधील कलम 3 व 4 कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली. या कारवाईचा परिणाम पुणे जिह्यातील सरकारी यंत्रणा अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर झाला आहे.

मोबाईल बंद कर !

अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे निवडणुका आणि राजकारणावर गप्पांचे फड रंगविण्यात माहीर आहेत. किंबहुना राजकीय कार्यकर्त्यांना कार्यालयातील खुर्चीत बसून सल्लेदेखील देतात. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून सरकारी कार्यालयांमधील राजकीय चर्चा थांबल्या आहेत. सोशल मीडियावर व्यक्त होण्यापासूनदेखील अनेक जण अलिप्त झालेत. काही जणांनी तर राजकीय पक्ष किंवा कार्यकर्त्यांशी संबंधित व्हॉट्सअप ग्रुपमधून निवडणूक काळापुरते बाजूला होण्याची भूमिका घेतली आहे. ओघाने चर्चा आली तर मोबाईल बंद कर म्हणून समोरच्यांना सूचना केली जात आहे.