Sangli Samachar

The Janshakti News

मिरजेत गांजा-नशेच्या गोळ्याचा साठा जप्त, कवठेमहांकाळच्या तरूणास अटक| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.१४ एप्रिल २०२४ -
मिरज रेल्वे स्थानकाजवळील कोल्हापूर उड्डाणपुलाखाली गांजा आणि नशेच्या गोळ्या विक्रीसाठी आलेल्या इ्म्रान उस्मान सनदे (वय ३०, रा. विजयनगर, महांकाली कारखान्याजवळ, कवठेमहांकाळ) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पकडले. त्याच्याकडून २ लाख ३६ हजाराचा ७ किलो ८६८ ग्रॅम गांजा आणि ६ हजाराच्या नशेच्या ७२० गोळ्या असा एकुण २ लाख ४३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक निरीक्षक पंकज पवार, कर्मचारी सुनिल जाधव, अभिजीत ठाणेकर, कुबेर खोत पेट्रोलिंग करत असताना त्यांना इम्रान सनदे हा कोल्हापूर उड्डाणपुलाखाली गांजा आणि नशेच्या गोळ्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने पुलाखाली जाऊन पाहणी केली. तेव्हा संशयास्पदरित्या थांबलेल्या इम्रान याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. त्याच्या सॅकमध्ये ७ किलो ८६८ ग्रॅम गांजा आणि नशेच्या ७२० गोळ्या आढळल्या. 


याबाबत पथकाने चौकशी केल्यानंतर त्याने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केल्यानंतर त्याने गांजा आणि नशेच्या गोळ्या कर्नाटकातील धारवाड येथील जावेद (पूर्ण नाव नाही) याच्याकडून खरेदी करून जादा दराने विकण्यासाठी आणल्याची कबुली दिली. इम्रान याला महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. सहायक फौजदार अनिल ऐनापुरे यांनी त्याच्याविरूद्ध फिर्याद दिली आहे.

निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पवार, कर्मचारी अरूण पाटील, सचिन धोत्रे, अमोल ऐदाळे, प्रकाश पाटील, सुनिल जाधव, रोहन घस्ते, विनायक सुतार, सूरज थोरात, अजय बेंद्रे, श्रीधर बागडी, कॅप्टन गुंडवाडे, स्वप्निल नायकोडे, अजित पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.