Sangli Samachar

The Janshakti News

पक्षाचा दबाव किंवा पक्ष प्रेमापेक्षा कार्यकर्त्यांचे प्रेम श्रेष्ठ ठरले; आता जे होईल ते होईल !| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२४ एप्रिल २०२४
सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटील बंडखोरी करत मैदानात उतरले. काँग्रेसच्या नेत्यांनी विशाल पाटील यांच्यावर प्रचंड दबाव आणला होता, कारवाईचा इशारादेखील दिला होता. तर दुसरीकडे जनतेचा प्रचंड दबाव निवडणुकीत उतरावे यासाठी होता. त्यामुळे विशाल पाटील यांनी काँग्रेस नेत्यांचा दबाव धुडकावून लावत बंड केले आहे. आता काँग्रेसचा मेळावा गुरुवारी सांगलीत होणार आहे. या मेळाव्यात विशाल पाटील यांच्याबद्दल काय भूमिका होणार ? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सांगली मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसलाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी प्रदेश व केंद्रीय पातळीवरील काँग्रेसच्या नेत्यांकडे केली होती. मात्र, महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेना (उबाठा) गटाने कोल्हापूर लोकसभेच्या बदल्यात सांगलीची जागा घेतली आणि उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी मिरजेतील सभेत शिवसेनेची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर केली. यानंतर काँग्रेस नेते आक्रमक झाले, जागेसाठी आग्रह करू लागले,


पण शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेने सांगली सोडली नाही. त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष लढण्याचा निर्धार केला. अर्ज दाखल केला. अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी विशाल पाटील यांच्यावर देखील उमेदवारी माघारीसाठी प्रदेशकाँग्रेसच्या नेत्यांनी दबावतंत्र वापरले. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी विशाल पाटील यांनी अपक्ष लढावे, यासाठी प्रचंड दबाव टाकला. भाजपमधील काही नाराजांनीदेखील विशाल पाटील यांनी लढावे, अशी इच्छा व्यक्त केली. अनेकांचा दबाव विशाल पाटील यांच्यावर होता. त्यामुळे अपक्ष अर्ज माघार घेणार नसल्याचे त्यांनी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितले, तर दुसरीकडे विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीकडून विशाल पाटील यांना पुरस्कृत करावे आणि चंद्रहार पाटील यांनी माघार घ्यावी, अशी मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले, मात्र हे प्रयत्न अयशस्वी झाले. आता विशाल पाटील अपक्ष मैदानात आहेत. ते जनतेच्या लाटेवर स्वार झाले आहेत. पण त्यांना काँग्रेसची मदत लागणार आहे.

विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्यासाठी विश्वजित कदम यांना महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना प्रचारात सक्रिय राहण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांचा शिवसेना (उबाठा) गटाचा प्रचंड दबाव येत आहे. त्या दृष्टीने काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात म, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगलीत काँग्रेस पक्षाचा मेळावा घेतला आहे. या मेळाव्यात पक्षाची भूमीका स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.