Sangli Samachar

The Janshakti News

मोदींची तुलना आता श्रीरामांशी ? स्मृती इराणी अडचणीत येणार ?



| सांगली समाचार वृत्त |
अमेठी - दि.२४ एप्रिल २०२४
देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राजकीय नेते आपल्या पक्षाचा जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. यावेळी एकामेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जातात. काही विधाने केली जातात. निवडणुका संपल्या तरी अशी विधाने कायमची लक्षात राहतात. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी कॉंग्रेसवर टीका करताना असेच एक विधान केले आहे.

लोकसभा निवडणुकीसंदर्भात केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार अनेक दिवसांपासून अमेठीत प्रचार करत आहेत. त्या अमेठी लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात जाऊन जनतेच्या भेटी घेत आहेत. गेल्या 5 वर्षात सरकारने केलेली विकासकामे त्या लोकांना सांगितली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कशाप्रकारे देशाचा विकास झाला? हे जनतेला सांगितले जात आहे. तसेच भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.

अमेठीतील कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस पक्षाचा उल्लेख लंका असा केलाय. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना श्रीराम यांच्याशी केली.


काय म्हणाल्या स्मृती इराणी?

आम्ही मोदीजींचे हनुमान आहोत आणि आता आम्हाला आमच्या मागण्या घेऊन काँग्रेस पक्षाच्या रूपाने लंकेला आग लावायची असल्याचे विधान स्मृती इराणी यांनी केले.

तिसऱ्यांदा उमेदवारी

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना भाजपने तिसऱ्यांदा तिकीट दिले आहे. भाजपचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी स्मृती इराणींवर पुन्हा एकदा मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींचा केला. अमेठीच्या खासदार म्हणून गेल्या 5 वर्षात लोकसभा क्षेत्रात केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम त्या सातत्याने करत आहेत.

राहुल गांधी पुन्हा स्वप्न दाखवतील

स्मृती इराणी यांनी अमेठी लोकसभेतील जनतेसमोर कॉंग्रेस पक्ष आणि कॉंग्रेस नेत्यांवर सडकून टीका केली. अमेठीसह देशभरात पुन्हा एकदा कमळ फुलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी 26 एप्रिलनंतर अमेठीत येऊन जनतेला पुन्हा फसवतील आणि मोठी स्वप्ने दाखवतील, असे त्या म्हणाल्या. काँग्रेस पक्षाने गेल्या 50 वर्षात काहीही केले नाही. आता जो विकास आपण अमेठीमध्ये पाहतोय तो कधीच झाला नव्हता, असेही स्मृती इराणी यांनी सांगितले.