Sangli Samachar

The Janshakti News

मैत्रीमध्ये किती ताणायचे? नाना पटोलेंचे सांगली, भिवंडीतील नाराजीवरून संकेत



| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि.१६ एप्रिल २०२४
सांगली आणि भिवंडीतील काही काँग्रेस नेते मला भेटायला नागपुरात येत आहेत. या संदर्भात अजूनही मला निरोप आलेला नाही. ते आले तर त्यांना भेटू, त्यांचे समाधान करून पाठवू. आमची आघाडी झालेली आहे. आघाडीमध्ये सर्वांचे समाधान होत नाही. आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. मैत्रीमध्ये किती ताणायच? असाही प्रश्न असतोच, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. 

महाविकास आघाडीच जागावाटप जाहीर झाले आहे. मात्र, महायुतीत किती भयावह मारामारी आहे, हे सर्वांसमोर आहे. आम्ही तर कामालाही लागलो आहोत. श्रीकांत शिंदेंची जागा फडणवीस यांना जाहीर करावी लागते. याच्यावरून महायुतीतल भांडण लक्षात येते, असा टोला पटोले यांनी लगावला. 
सांगली आणि भिवंडीचे आमचे लोक भेटायला आले तर आम्ही त्यांचे समाधान करू आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी सर्वांनी प्रचार करा व काम करावे अशी विनंती करू. त्यांना आज आम्ही समजावून सांगू आणि मार्ग काढू. भेटल्यावर आम्ही बोलू आणि त्यांची नाराजी दूर करू, असे पटोले यांनी सांगितले. 


विदर्भातील पाचही जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय होईल, असा दावा पटोले यांनी केला. भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात प्रचंड चीड मतदारांमध्ये दिसून येत आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्याला लोक पसंती दाखवत आहेत. विदर्भात भाजपच्या दिग्गजांच्या सभांमध्ये लोक नव्हते. त्यांना लोक आणावे लागले, भाषण सुरू असताना लोक उठून जात होते. काँग्रेसच्या सभेत मात्र लोकांची गर्दी होती. लोकांचा नेत्यांच्या मुद्द्यांवर रिस्पॉन्स होता. पहिल्या टप्प्यातील पाचही जागा आम्ही जिंकू, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. तसेच गडचिरोली मधील आदिवासी पंतप्रधान मोदींचा फोटो सुद्धा पाहायला तयार नाहीत एवढी त्यांना चीड आहे, असा दावाही पटोले यांनी केला.