Sangli Samachar

The Janshakti News

वीज दरवाढीचे दरमहा गणितसांगली समाचार - दि ४ एप्रिल २०२४
मुंबई  - समजा तुमचा दर महिन्याचा वीज वापर शंभर युनिट आहे, तर सध्याच्या बिलात दरमहा ४९ रुपये, तर वर्षभराच्या बिलात ५८८ रुपयांनी वाढ होणार आहे. वापर ३०० युनिट असेल तर दरमहाच्या वीजबिलात ८४७ रुपयांनी तर वर्षभराच्या बिलात १० हजार १६४ रुपयांनी वाढ होणार आहे. 

राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार महावितरणने बिलात सरासरी साडेसात टक्क्यांची वाढ लागू केली आहे. तर स्थिर आकारातही दहा टक्के दरवाढ केली आहे. ही वाढ एक एप्रिलपासून लागू झाली आहे. यामुळे ग्राहकांच्या बिलात किती वाढ होणार, ग्राहकांच्या खिशाला नेमका किती भुर्दंड बसणार याचा अभ्यास केल्यानंतर शंभर युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात फटका बसणार आहे. परंतु त्यापेक्षाही तीनशे युनिट आणि त्यावरील विजेचा वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांच्या वीजबिलात मोठी वाढ होणार आहे.

अशी होते बिलाची आकारणी

शंभर युनिटपर्यंत तुमचा वीजवापर असेल तर प्रतियुनिट जो दर निश्‍चित केला आहे त्या दराने शुल्क आकारले जाते

शंभर युनिटच्या वर एक युनिट जरी तुमच्या विजेचा वापर झाला तर शंभर युनिटपर्यंत प्रतियुनिट निश्‍चित केलेला दर (नव्याने लागू झालेला प्रतियुनिट ५ रुपये ८८ पैसे) आकारला जातो

शंभर युनिटच्या वरील एका युनिटसाठी दुसरा दर (म्हणजे नव्याने लागू केलेला ११ रुपये ४६ पैसे) लागू करून वीज आकार निश्‍चित केला जातो

वीज आकाराशिवाय स्थिर आकार, वीजवहन आकार (१.१७ रुपया प्रतियुनिट), इंधन समायोजन आकार, वीज शुल्क (स्थिर आकार, वीज आकार आणि वहन आकार यांची एकत्रित बेरीज करून त्या रकमेवर १६ टक्के) आणि वीज विक्री कर (प्रतियुनिट १ रुपया) अशी सर्वांची मिळून गोळाबेरीज करून वीजबिल आकारले जाते.

 
हे लक्षात ठेवा

सरासरी साडेसात टक्क्यांची वाढ केल्याचे महावितरणकडून जाहीर

प्रत्यक्षात शंभर युनिट वापर असलेल्याग्राहकांच्या दर महिन्याच्या वीजबिलात ६.१७ टक्क्यांनी वाढ होणार

तीनशे युनिट विजेचा वापर असलेल्या ग्राहकांच्या वीजबिलात दरमहा २४.७४ टक्क्यांनी वाढ होणार

पाचशे युनिट वीजवापर असलेल्या ग्राहकांच्या वीजबिलात दरमहा ३६.४४ टक्के वाढ होणार